वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने देशभरात ‘नीट’ ही एकच सामाईक प्रवेश परीक्षा जाहीर केल्याच्या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी राज्याची सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी विद्यार्थ्यांनी काहिशा गोंधळलेल्या मन:स्थितीत दिली. सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’विषयी सुनावणी आणि दुसरीकडे राज्य शासनाची सीईटी परीक्षा या दडपणात शहर परिसरात १९ हजारहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले. या वेळी मुलांसह पालकांच्या चेहऱ्यावरील दडपण स्पष्ट जाणवत होते. आधीपासून परीक्षेची तयारी केल्यामुळे काहींना या गोंधळाचा परीक्षा देताना ताण वाटला नाही तर काहींनी या घोळामुळे आम्ही अधिकच गोंधळात सापडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
मागील आठवडय़ात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारने नीट परीक्षा अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही भंबेरी उडाली. ‘नीट’साठी बारावीबरोबर अकरावीचा अभ्यास गरजेचा असताना तो करण्यासाठी वेळ अपुरा पडणार होता. दुसरीकडे, राज्य सरकारकडून होणारी सीईटी परीक्षा बारावी अभ्यासक्रमापुरती मर्यादित असल्याने विद्यार्थी आश्वासक असले तरी नीट द्यावी लागली तर पुढे काय, या बाबत बराच ऊहापोह झाला. याबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना राज्य सरकारने सीईटी घेतली. केटीएचएम महाविद्यालयात सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत परीक्षा झाली. त्यात पहिल्या सत्रात भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र, दुसऱ्या सत्रात जीवशास्त्र आणि गणित विषयाचा पेपर झाला. ‘सीईटी’ची परीक्षा आणि दुसरीकडे नीटचा घोळ यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण होते.
या विषयी धीरज दरेकर या विद्यार्थ्यांने नीट परीक्षेचा निर्णय ऐनवेळी झाल्यामुळे आपण गोंधळलो असल्याचे नमूद केले. एआयएनपी दिल्यानंतर नीट परीक्षा द्यायची की नाही तेही माहीत नाही. त्यात सीईटी महत्त्वाची की नीट महत्त्वाची, असा प्रश्न पडला. यामुळे कोणती परीक्षा द्यायची हा संभ्रम कायम असल्याने त्याच मानसिकतेत आजचे पेपर देत असल्याचे धीरजने सांगितले. अनेक विद्यार्थ्यांची भावना अशीच होती.
विष्णू कातळे याने ‘सीईटी’चे पेपर व्यवस्थित गेल्याचे सांगितले. संपूर्ण ग्रुप सोबत असल्याने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी हे दोन्ही पर्याय खुले असल्याने परीक्षेचा त्रास नाही. पण नीटचा प्रश्न येतो, तेव्हा त्याचा अभ्यासक्रम आणि मिळणारा कालावधी पाहून गोंधळ उडतो, असे सांगितले. विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांची अवस्था झाली आहे. बहुतांश पालक विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी सुटी घेऊन केंद्रावर थांबून राहिले.
पालक डी. टी. खैरनार यांनी मुलांनी वर्षभर मेहनत घेतल्याचे नमूद करत सरकार ऐनवेळी कोणतीही परीक्षा जाहीर करते, त्याचा अभ्यासक्रम, कालावधी, मुलांवर येणारा ताण याचा विचार होणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले.
सीईटीचा अभ्यास मुलांनी सुरुवातीपासून समांतर पद्धतीने सुरू ठेवल्यामुळे त्याविषयी फारशी भीती नाही. पण नीटविषयी अभ्यासक्रमापासून सर्व गोंधळ असल्याचे मत त्यांनी मांडले.