उत्तर महाराष्ट्रात नगरपालिकांच्या निवडणुकीत सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह फारसे बळ अस्तित्वात नसलेल्या मनसेनेही स्वबळावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्य़ात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीला पदरी असलेल्या जागा राखण्याचे आव्हान आहे.

नाशिक जिल्ह्य़ात मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, भगूर या सहा नगरपालिकांवर वर्चस्वासाठी राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे. या सहापैकी भगूर, सिन्नर आणि मनमाडचा काहीसा अपवाद वगळता इतर तीन पालिकांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. केंद्र व राज्यात सत्ता मिळाल्याने पालिका निवडणुकांमध्येही विजयाच्या अपेक्षेने भाजप आणि शिवसेना दोघांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चामुळे ढवळून निघालेले वातावरण, कांद्यासह इतर कृषिमालास मिळणारा अल्प भाव, दिवसेंदिवस वाढणारी महागाई या मुद्दय़ांमुळे ग्रामीण जनता पुन्हा एकदा आपणास साथ देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. पालिका निवडणुकीसाठी भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती, आघाडी होईल किंवा नाही हे अद्यापही जाहीर झालेले नसले तरी नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतील इच्छुकांनी प्रचारास सुरुवातही केली आहे.

राष्ट्रवादीची कोंडी

मनमाड पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने उमेदवारीच्या तयारीत असणाऱ्या पुरुषांना आता आपल्या पत्नीला पुढे आणल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. ३१ जागा असलेल्या या पालिकेत मागील निवडणुकीत मित्रपक्षांच्या सहायाने राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळविल्या होत्या. मागील निवडणुकीत आमदार पंकज भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले होते. ईडीकडून पंकज यांचीही चौकशी होत असल्याने त्याचाही परिणाम राष्ट्रवादीवर झाला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सत्ताबदल होऊन नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले. पाणीप्रश्न ही मनमाडची प्रमुख समस्या असून त्या समस्येभोवतीच निवडणुकीचा प्रचार रंगण्याची चिन्हे आहेत. आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने नांदगाव पालिकेत १७ पैकी १४ जागा मिळविल्या होत्या. काँग्रेसला दोन, तर शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली होती. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर नेतृत्वाचे संकट आहे. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. युती न झाल्यास सिन्नरमध्ये माजी माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि प्रकाश वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात मुख्य लढत होईल. मागील निवडणुकीत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले होते. त्यानंतर कोकाटे हे भाजपमध्ये गेल्याने पालिकाही भाजपकडे गेली. १४ प्रभागांतून २८ उमेदवार निवडून द्यावयाचे असून नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आहे.

राजकीय उलथापालथीतही शिवसेनेने भगूर पालिकेवरील आपली एकहाती सत्ता २० वर्षांपासून टिकवून ठेवली आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडून होणार आहे. युती न झाल्यास प्रमुख लढत शिवसेना आणि भाजप यांच्यातच होणार हे निश्चित. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या पत्नी विद्यमान नगराध्यक्ष अनिता करंजकर या पुन्हा रिंगणात राहण्याची शक्यता आहे. याशिवाय इच्छुकांच्या यादीत राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे, भारती साळवे, विद्या बलकवडे, निर्मला करंजकर, सुनंदा शेटे यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या पालिकेवर भुजबळ यांच्या अनुपस्थितीतही वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर असताना नेमकी हीच संधी साधण्यासाठी विरोधकही कामास लागले आहेत. अल्पसंख्याकांचे अधिक मतदान असलेल्या या पालिकेत २००१ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीत हुसेन शेख हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. राष्ट्रवादीला कायम साथ दिल्याने अल्पसंख्याकांना नगराध्यक्षपदासाठी संधी देण्याचा आग्रह त्यांच्याकडून होत आहे.

सटाणा पालिकेच्या सर्वसाधारण जागेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदावर अनेकांचा डोळा आहे.

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडूना पांडुरंग सोनवणे, गटनेते बाळासाहेब रौंदळ, माजी आमदार संजय चव्हाण, द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत आदी, तर काँग्रेसकडून विधायक कार्य समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय पाटील इच्छुक आहेत. भाजपकडून नाशिक जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, विलास बच्छाव यांची तयारी सुरू आहे.