नाशिकरोड बँकेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना अर्थसाहाय्य
शिवसेना आणि नाम फाऊंडेशन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करत आहे. परंतु ही मदत किती काळ पुरणार, असा प्रश्न करत संबंधितांनी त्याऐवजी उपरोक्त कुटुंबांना स्वावलंबी बनविण्यासाठी शेती व उत्पन्नाच्या साधनांच्या स्वरूपात आधार देण्याची गरज आहे, असे राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी राज्य शासनाने शेतीशी संबंधित मूळ प्रश्न सोडविण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सूचित केले.
येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेतर्फे शुक्रवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. संजय राऊत, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आदी उपस्थित होते. बँकेने पीडित कुटुंबांना मदत देण्याचा घेतलेला योग्य असून या कुटुंबांना स्वावलंबी करण्यासाठी बँकेने त्यांचे समुपदेशन करावे. कर्ज उपलब्ध करून देताना एक लाख रुपये बीज भांडवल सरकार देईल. शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी शासन २० कृषीमालाचे हमीभाव निश्चित करणार आहे. बाजाराच्या ठिकाणी शीतगृह उभारून विक्रीसाठी आणलेला कृषीमाल त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांना त्या मालावर कमी व्याज दरात कर्जही घेता येईल, अशी व्यवस्था उभारण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ठिबकसाठी घेतलेले अथवा कृषी कर्जाच्या व्याजात माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शेतीशी संबंधित मूळ प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस आघाडी शासनाने प्रदीर्घ काळात काही केले नसल्याने शेतकऱ्यांवर ही स्थिती ओढवल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला शेती करण्यासाठी पुढे येतील असे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीला पूरक असे व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्त संस्थांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. राज्यमंत्री भुसे यांनी दुष्काळग्रस्तांच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमात ८८ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी २० हजार रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच २०१६-१७ या वर्षांत ३०० मुला-मुलींना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे बँकेच्यावतीने जाहीर करण्यात आले.