केळकर स्मृती व्याख्यानात शामल दत्ता यांचे प्रतिपादन

देशाच्या बहिर्गत सुरक्षिततेप्रमाणे अंतर्गत सुरक्षितताही महत्वाची आहे. अंतर्गत सुरक्षिततेसाठी काही जुने कायदे व नियमात बदल होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देता येईल, असे प्रतिपादन नागालँडचे माजी राज्यपाल आणि गुप्तचर यंत्रणेचे संचालक शामल दत्ता यांनी केले. येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्यावतीने गुरूवारी आयोजित सातव्या एल. व्ही. केळकर स्मृती व्याख्यानात त्यांनी ‘चेजिंग डायनॅमिक्स ऑफ पोलिसिंग’ या विषयावर भूमिका मांडली.

या वेळी अकादमीचे संचालक नवल बजाज, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, अकादमीचे सहाय्यक संचालक मितेश गट्टे, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, उपायुक्त श्रीकांत धिवरे आदी उपस्थित होते. एल. व्ही. अर्थात लक्ष्मण विष्णू केळकर यांनी नाशिक पोलीस अकादमीतून (१९३७-३८) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ३५ वर्षे पोलीस दलातील सेवेत विविध पदांवर काम करताना उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. केळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केळकर कुटुंबीयांतर्फे पोलीस अकादमीत दरवर्षी एल. व्ही. केळकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यंदाच्या व्याख्यानात गुप्तचर विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या दत्ता यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अंतर्गत सुरक्षिततेविषयीच्या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक आहे. जुन्या कायद्यांच्या आधारे आपण नव्या आव्हानांना तोंड देऊ शकत नाही. एकविसाव्या शतकाचा विचार करता कायद्यात काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. कायद्यांची पुनर्रचना करण्याची खरी गरज त्यांनी अधोरेखीत केली. डॉ. विजय केळकर यांनी वडील लक्ष्मण केळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. गट्टे यांनी आभार मानले.