सोमवारी नाशिकमध्ये आदर्श सेवक, संस्था पुरस्कार सोहळा

आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभाराची उदाहरणे नित्यनेमाने समोर येत असतानाच त्यावर कडी करण्याचे काम आता या विभागाने केले आहे. या विभागातर्फे आयोजित आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार कार्यक्रमास माजी मंत्री आ. छगन भुजबळ हे मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात वर्षभरापासून भुजबळ यांचा मुक्काम कारागृहात असल्याचा विसर या विभागाला पडल्याचे कार्यक्रमपत्रिकेवरून दिसते.

आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांतील पुरस्कारांचे वितरण सोमवारी सकाळी ११ वाजता येथील महाकवी कालिदास कला मंदिरात होणार आहे. या सोहळ्याची आदिवासी विकास विभागाने निमंत्रणपत्रिका तयार केली आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विशेष उपस्थितीत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यात प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्’ाातील खासदार व सर्व आमदारांना सरसकट स्थान देण्यात आले आहे. यादीत कारागृहवासी छगन भुजबळ यांचा उल्लेख पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांना अटक होऊन वर्षपूर्ती झाली. त्यांच्या अटकेवरून भुजबळ समर्थकांनी स्थानिक पातळीवर बरीच आंदोलने केली होती. असे असताना नाशिक येथे मुख्यालय असणाऱ्या आदिवासी विकास विभागास ही बाब पत्रिका छपाईवेळी कशी अज्ञात राहिली, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

दरम्यान, आदिवासींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासन राबवीत असलेल्या योजनांची माहिती आदिवासींपर्यंत पोहचावी, स्वयंरोजगारासाठी प्रयत्न, कुटुंब नियोजन, बालविवाहाची प्रथा बंद आदीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. २५,००१ रुपये रोख व सन्मानपत्र हे आदिवासी सेवक पुरस्काराचे तर ५०,००१ रुपये रोख व सन्मानपत्र हे सेवा संस्था पुरस्काराचे स्वरूप आहे.