शासन बालमृत्यूंबाबत अत्यंत संवेदनशील असून लवकरच जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच ते सहा नवीन ‘इनक्युबेटर’ची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. जिल्हा रूग्णालयात झालेल्या ५५ बालकांच्या मृत्यूनंतर डॉ.सावंत यांनी शनिवारी रुग्णालयातील विशेष नवजात दक्षता कक्षाची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी डॉ. सावंत म्हणाले की, नाशिक जिल्हा रुग्णालयात २०० किमी परिसरातून नवजात बालके उपचारांसाठी दाखल होतात. दरवर्षी राज्यातील रुग्णालायामधील विशेष नवजात दक्षता कक्षात साधारणत: २८ हजार बालके उपचारासाठी दाखल होत असत. हे प्रमाण सुमारे ५० हजारांपर्यंत पोहोचले आहे. एप्रिल-मे महिन्यात स्थलांतरीत नागरिक शहरात आल्याने देखील जंतूसंसर्गाचे प्रमाण वाढते. ते कमी करण्याचे मोठे आवाहन आरोग्य यंत्रणेपुढे आहे. या आवाहनाला सामोरे जाताना अत्यंत कमी वजनाच्या नवजात बालकांनादेखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे. रुग्णालयात केंद्राच्या मानकाप्रमाणे व्हेंटीलेटरची संख्या आहे आणि आवश्यकता वाटल्यास व्हेंटीलेटरची संख्या देखील वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बाल मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे निर्देश तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासन या प्रकरणी गंभीर असून लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. माता आणि बाल आरोग्य कक्षासाठी २१ कोटी मंजूर करण्यात आले असून या कक्षाच्या उभारणी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सुचना दिल्या असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. रुग्णालयातील बंद पडलेली यंत्रणा येत्या तीन आठवड्यात सुरू कराव्यात,असे निर्देश डॉ.सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. रुग्णालयात खाजगी रुग्णालयाएवढेच चांगले उपचार होत असून गरजू रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी यंत्रणा चांगल्यारितीने सुरू राहिल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.