गोदावरीच्या दोन्ही तीरांवरील भागांना जोडणाऱ्या आणि अतिशय मध्यवर्ती परिसरात असलेल्या रविवार कारंजा ते महाबळ चौक या एकेरी मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी वाहतूक मार्गात झालेल्या बदलांमुळे गुरुवारी पर्यायी मार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दुसरीकडे पंचवटीकडे जाणारी वाहतूक रामवाडी पुलावरून मार्गस्थ करण्यात आली. मालेगाव स्टँडकडून येणारी वाहने शनी चौकातून अशोक स्तंभावर येत असल्याने या चौकात वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. रविवार कारंजा परिसरातील थांबा कुठे असणार याची स्पष्टता नसल्याने त्याचा फटका बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला.
वाहतुकीतील बदलांमुळे स्थानिक व्यावसायिक व रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. रविवार कारंजा ते महाबळ चौकपर्यंतच्या एकेरी मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंद करण्यात आला. जवळपास तीन महिने हे काम चालणार असल्याने वाहतुकीचे हे र्निबध तोपर्यंत कायम राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी आधीच स्पष्ट केले होते. तथापि, अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या मार्गाच्या कामात कालापव्ययाचा अनुभव असल्याने हे काम निर्धारित वेळेत होईल की नाही, याबद्दल स्थानिकांना साशंकता आहे. वाहतुकीच्या मार्गातील बदल गुरुवारपासून अमलात आले आणि काम पूर्ण होईपर्यंत काय स्थिती राहील याची झलक पाहावयास मिळाली. रविवार कारंजा आणि सभोवतालचा परिसर ही शहराची मुख्य बाजारपेठ. अतिशय गजबजलेल्या आणि दाटीवाटीच्या परिसरात रस्ते अतिशय अरुंद. त्यात रस्त्यावरील बहुतांश जागा छोटे विक्रेते व्यापत असल्याने वाहनधारकांना हा परिसर ओलांडणे अग्निदिव्य ठरते. वाहतुकीतील बदलांमुळे त्यात आणखी भर पडल्याचे पाहावयास मिळाले. या बदलांची अनेक वाहनधारकांना कल्पना नव्हती. यामुळे सीबीएस वा गंगापूर रोडकडून आलेल्या आणि रविवार कारंजा व लगतच्या बाजारपेठेत जाऊ इच्छिणाऱ्यांना अशोक स्तंभाकडून तिकडे जाता आले नाही. कारण रविवार कारंजा ते अशोक स्तंभ या एकेरी मार्गावरून पंचवटीतून येणारी वाहतूक वळविली गेली. या स्थितीत काही दुचाकी चालक मात्र मार्गस्थ होत होते. सीबीएसकडून येणाऱ्या वाहनधारकांना रामवाडी पुलावरून थेट सरळ जावे लागले, तर गंगापूर रोडकडून आलेल्यांना अशोक स्तंभ परिसरात रामवाडी अथवा मेहेर सिग्नलकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध होता.पंचवटीकडून येणाऱ्या वाहनधारकांची पूर्वकल्पना नसल्याने धांदल उडाली. रविवार कारंजा चौकातून त्यांना अशोक स्तंभाकडे जाणे क्रमप्राप्त ठरले. या चौकात येऊन त्यांना मेहेर चौकातून सीबीएस अथवा शालिमारकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध होता. या बदलांचा केंद्रबिंदू अशोक स्तंभ चौक असल्याने या ठिकाणी भल्या सकाळपासून तीन ते चार वाहतूक पोलीस नियमनासाठी दाखल झाले होते. एका भागाकडील वाहनधारकांना मार्गस्थ करण्यासाठी त्यांना दुसऱ्या भागाकडील वाहतूक थांबवणे क्रमप्राप्त ठरले. चौकात मुख्य मार्गासह आसपासच्या गल्लीबोळातून वाहने येत असल्याने गोंधळ उडत होता. रामवाडीकडून अशोक स्तंभाकडील वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनधारकांना थेट चोपडा लॉन्सच्या पुलाचा आधार घ्यावा लागला. रविवार कारंजाकडून महाबळ चौकापर्यंत वाहतूक बंद झाल्यामुळे उपरोक्त मार्गावरील व्यावसायिकांमध्ये नाराजीची भावना आहे. सर्व वाहतूक रविवार कारंजा ते अशोक स्तंभ मार्गावरून मार्गस्थ झाल्यामुळे कोणी ग्राहक फिरकणार नसल्याने व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे.