गणरायाच्या आगमनाला अवघ्या नऊ दिवसांचा अवधी शिल्लक असताना आरोग्य विभागाने त्यादृष्टिने तयारी सुरू केली आहे. गणेश विसर्जन ज्या ज्या ठिकाणी होते, त्या नदीवरील घाटांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दसक पंचक घाट, दारणा नदी, देवळाली गाव आणि वडनेर गेट येथील वालदेवी नदीकाठाची स्वच्छता करण्यात आली.

शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. कोणाच्या घरी दीड दिवस तर कोणाच्या पाच आणि दहा दिवस गणेश विराजमान असतो.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत नाशिकरोड विभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापुरामुळे पात्रात ठिकठिकाणी कचरा वाहून आला आहे.

घाटावरील रेलिंगवर तो अडकलेला आहे. हा सर्व कचरा काढून तो लगेच घंटागाडीद्वारे उचलण्यात आला. या परिसरात ज्या ज्या ठिकाणी गणेश विसर्जन होते, त्या क्षेत्राच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

त्यात दसक पंचक घाट, दारणा नदी, विहितगाव, देवळाली गाव व वडनेर गेट येथील वालदेवी नदीचे पात्र उपरोक्त क्षेत्राची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या मोहिमेत ८६ स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले. एकाच दिवसात अंदाजे १३ टन कचरा बाहेर काढून तो घंटागाडीमार्फत उचलण्यात आला. पुढील दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.