मानसरोवरातील जल कुशावर्तात अर्पण
कैलास मानसरोवरातून आणलेले जल आणि गोदावरीतील जल यांचा सिंहस्थ पर्वणीनिमित्त अनोखा संगम झाला आहे. ही अतिशय महत्वपूर्ण घटना असून यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारत आणि चीनचे संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने मुंबईतील चिनी दुतावास आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीर्ने कुशावर्त तीर्थात कैलास मानसरोवराचे जल अर्पण करण्याचा सोहळा गुरूवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कौन्सिल जनरल यान हुआ लॉन्ग, अ‍ॅन लिना, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. फडणवीस यांच्या  हस्ते गंगा आरती करण्यात आली. भारत-चीन संबंध दृढ करण्यासाठी कार्यरत संस्थेने ही संकल्पना मांडली. त्यास चीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या पध्दतीने मानसरोवरातील जल येथे आणले गेले, त्याच पध्दतीने कुशावर्त तीर्थातील जल मानसरोवरात अर्पण करण्यात येणार आहे.
या सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज अनोखा संगम झाल्याची भावना व्यक्त केली. ऑब्झव्‍‌र्हर संस्थेचा दोन्ही देशांदरम्यान पवित्र जलाचा राजनय (डिप्लोमसी) झाला पाहिजे असा प्रयत्न होता. त्या अंतर्गत संस्थेच्या सुधिंद्र कुलकर्णी, विजय भटकर, अंजली भागवत व पोपटराव पवार आदींच्या शिष्टमंडळाने हे पाणी आणले. यामुळे हा सिंहस्थ जागतिक पटलावर पोहोचल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री येती घरा..
जलार्पण सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर, मुख्यमंत्री कुशावर्तावर येणार असल्याने गुरूवारी रात्री साडे अकरापासून कुशावर्त तीर्थ भाविकांना स्नानासाठी बंद करण्यात आले. तेव्हापासून कुशावर्तावर साफसफाईचे काम सुरू झाले. देवस्थानचे १० ते १५ कर्मचारी एक ते दीड तास मुख्यमंत्र्यांच्या नजरेस कचरा पडू नये याची दक्षता घेत होते. या परिसरात भाविकांनी काढलेल्या चपला बाहेर फेकून देण्यात आल्या. घोळक्याने उभ्या असणाऱ्या पोलिसांना एका रांगेत कुंडाभोवती तटबंदी करण्याची सूचना दिली गेली. जे पोलीस आपली टोपी परिधान करण्यास विसरले होते, त्यांना ध्वनिक्षेपकावरून आठवणही करून देण्यात आली.