घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप

इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन आक्रोश केला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन रुग्णालयाची पाहणी करत असताना नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय संबंधितांनी व्यक्त केला. शहरात गुन्हेगारी वाढत आहे. त्यातून हा प्रकार घडला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आत्महत्येमागील कारणांची अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

काजल संजय साळवे (१८) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सातपूर येथे वास्तव्यास असलेली काजल व्ही. एन. नाईक महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. सध्या महाविद्यालयात परीक्षा सुरू आहे. सोमवारी सकाळी ती पेपर देण्यासाठी आली. नऊ वाजता पेपर वर्ग शिक्षकांकडे सोपवून ती निघून गेली. नंतर दीड तासाने ती पुन्हा महाविद्यालयात आल्याचे सांगितले जाते. परीक्षा झाली असल्याने महाविद्यालय इमारतीत वरच्या मजल्यावर विद्यार्थ्यांची फारशी वर्दळ नव्हती. याच काळात काजल इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेल्याचा अंदाज आहे. तेथून तिने उडी मारली. ही बाब लक्षात आल्यावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी तातडीने धाव घेतली. तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सरकारवाडा पोलिसांनी तातडीने धाव घेऊन या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यानच्या काळात मुलीचे पालक नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सकाळी महाविद्यालयात गेलेल्या मुलीला निपचित पडल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. वडील भोवळ येऊन खाली कोसळले. याच कालावधीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे रुग्णालयातील विशेष नवजात बालकांच्या उपचार कक्षाची पाहणी करण्यास आले होते. साळवे कुटुंबीयांनी त्यांची भेट घेऊन या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनावर आहे. गुन्हेगारीच्या घटना वाढत असून त्यातून हा प्रकार घडला. ही अतिशय गंभीर बाब असून त्याची दखल घेण्याची मागणी संबंधितांनी केली.

रुग्णालयात तोडफोड

काजलचा भाऊ व चुलत बहिणीने या घटनेला शैक्षणिक संस्था जबाबदार असल्याचा आरोप केला. काजल कधीही आत्महत्या करू शकत नाही. या घटनेमागे घातपाताची शक्यता त्यांनी वर्तविली. शालेय गणवेशात असलेल्या काजलच्या भावाने रुग्णालयातील काचेची तोडफोड केली. नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहून शिक्षकांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.