भाजप उद्योजक आघाडीच्या बैठकीत निर्णय; विविध कारणांमुळे ४५ हजार ५००उद्योग बंद

राज्यात विविध कारणांमुळे बंद असलेल्या ४५ हजार ५०० उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय येथे इंजिनीअरिंग क्लस्टर मध्ये भाजप उद्योग आघाडीतर्फे झालेल्या उद्योजकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. यावेळी उद्योजकांच्या हिताचे विविध ठराव संमत करून ते शासनाकडे पाठविण्यात आले.

आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये झालेले संमेलन आणि प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीस राज्यभरातील २०० पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते. राज्यभरातील बंद कारखान्यांची माहिती जमा करण्यास चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागल्याची माहिती सिन्नरचे उद्योजक नामकर्ण आवारे यांनी दिली.

बंद असलेल्या ४५,५०० उद्योगांमध्ये कोकण (१२२८७), पुणे (१८४५३), अमरावती (२७९२) आणि नाशिक विभागातील (६९९६) उद्योगांचा समावेश आहे. नाशिक विभागातील बंद कारखान्यांमुळे एक लाखाहून अधिक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून ३११९ कोटी रुपयांची गुंतवणूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शासनाची ३४८८ एकर जमीन पडून असल्याची माहितीही आवारे यांनी दिली. राज्यातील बंद कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास आणि आघाडीने सुचविलेल्या काही उपाययोजना शासनाने हाती घेतल्यास ४५,५०० पैकी ३४, १२५ उद्योग पूर्वंवत सुरू होऊ  शकतात. त्यामुळे २० लाख ४७ हजार ५०० नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ  शकतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

दोन दिवसांच्या या परिषदेस इज ऑफ डुईंग बिझनेस, औद्योगिक शासकीय योजना, कृषी उद्योगांपुढील आव्हान, बंद व आजारी कारखान्याचे पुनरुज्जीवन, जीएसटीची तयारी, उद्योग आघाडीचे कार्य, सामूहिक विकास योजना आदी विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराची कास धरावी. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असून उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे धोरण असल्याने उद्योजकांनी त्याचा लाभ उठवावा, असे आवाहन रवींद्र भुसारी यांनी यावेळी केले.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी तसेच अंबड व सातपूर परिसरात सैाहार्दाचे वातावरण कायम टिकविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत, असे नमूद केले. काही संघटनांमुळेच नाशिकमधील काही उद्योग बाहेर गेले असून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या उभारणीत सानप यांचे योगदान अधिक असल्याची माहिती पेशकार यांनी दिली. उद्योग सहसंचालक बी. एस. जोशी यांनीही त्यांची री ओढली. दोन दिवसांच्या या परिषदेस भाजपचे संघटनमंत्री भुसारी, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विजय साने, माजी आमदार वसंत गीते, सुनील बागूल, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे आदींनी संमेलनास उपस्थित राहुन उद्योजकांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले.

निर्लेप उद्योग समुहाचे अध्यक्ष राम भोगले, रुद्राणी उद्योग समुहाचे अध्यक्ष विवेक देशपांडे तसेच कोकोयु कॅम्लिन उद्योगाचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, अमरावतीचे किरण पातुरकर, धुळ्याचे गोवर्धन मोदी, कर सल्लागार अशोक नवाल, कोल्हापूरचे प्रकाश मालाडकर, नागपूरचे मोहन देव, नगरचे मिलिंद कुलकर्णी आदींनी यावेळी उद्योजकांना बहूमूल्य अशा सूचना केल्या. सूत्रसंचालन व्हीनस वाणी, आशिश नहार आणि नेहा खरे यांनी केले