राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी ऐन दिवाळीत मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी वर्गाचे प्रचंड हाल झाले. या संपाचा गैरफायदा घेत स्थानकाबाहेर खासगी टेम्पो, टॅक्सीचालकांनी अवाच्या सवा भाडेआकारणीस सुरुवात केली. लांब पल्ल्याच्या खासगी बसच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. या स्थितीत चौधरी यात्रा कंपनीने त्र्यंबकेश्वरसाठी मोफत, तर बाहेरगावी जाणाऱ्या बसमध्ये एसटीच्या तुलनेत निम्मे भाडे आकारत प्रवाशांना दिलासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, पगारवाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. सोमवारी रात्री १२ वाजेपासून रस्त्यांवर धावणाऱ्या एसटी बसची चाके थांबण्यास सुरुवात झाली. त्याचे दृश्य परिणाम मंगळवारपासून जाणवू लागले. जिल्ह्यातील १३ आगारांमधून रात्रीपासून एकही एसटी बस बाहेर पडली नाही. लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी जवळच्या स्थानकांचा आधार घेत प्रवाशांना उतरवून दिले. तर काही मोठय़ा शहराच्या आगारात किंवा पहाटेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी प्रवाशांना पोहोचते केले.

शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, ठक्कर बाजार व मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानकातील एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. लांब पल्ल्याच्या बसचालकांनीही स्थानकाचा आधार घेत तिथे मुक्काम ठोकला. संपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मंगळवारी सकाळपासून दिवाळीसाठी गावी जाण्यास निघालेले चाकरमानी, माहेरवाशीण व विद्यार्थ्यांची गर्दी झाली. बस सेवा ठप्प असल्याने गावी कसे जायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. बस कधी सुटणार अशी विचारणा होऊ लागल्याने चौकशी केंद्राला ताळे ठोकत कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. बेमुदत संप असला तरी तो कोणत्याही क्षणी मिटेल या आशेने प्रवासी बस स्थानक परिसरात रेंगाळत राहिले.

पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील बस स्थानकांवरील तब्बल दोन हजारहून अधिक बस फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासकीय बसगाडय़ा बंद झाल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी संधीचे सोने करत अवाच्या सवा भाडे आकारात प्रवाशांची लूट सुरू केली. कसारा किंवा जिल्ह्याच्या अन्य भागात जाण्यासाठी प्रवाशांना दुप्पट, तिप्पट भाडे मोजावे लागले. नाइलाजास्तव काही प्रवाशांनी खासगी बसचा पर्याय स्वीकारला तर काहींनी माघारी परतणे पसंत केले. या गोंधळाबाबत अनभिज्ञ असणारी बच्चे कंपनी मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक होती. मात्र समोर दिसणाऱ्या बस रिकाम्या असूनही आपण त्यात बसत का नाही, या बसेस कधी सुटणार अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी पालकांना भंडावून सोडले. घरी माघारी जायचे समजल्यावर त्यांचा हिरमोड झाला.

संप काळात एसटी बसचालक व वाहकांनी बसमध्ये निद्राधीन होण्याचा आनंद घेतला. काहींनी पत्त्याचा डाव मांडत गप्पांची मैफल रंगविली. संपाच्या पाश्र्वभूमीवर, छात्रभारती संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. बस उपलब्ध नसल्याने परीक्षा केंद्रावर ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. जे विद्यार्थी केवळ संपामुळे परीक्षेस पोहोचू शकले नाहीत, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी खासगी वाहनातून प्रवास करत आहेत. त्यामुळे काही अपघात घडल्यास परिवहन महामंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी छात्रभारतीने केली आहे.

शहर बस सेवाही मर्यादित

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणारी शहर बस सेवा पंचवटी आगारातून नाशिक रोडसह अन्य काही ठिकाणी सुरू होती. संपात शिवसेनाप्रणीत वाहतूक सेना सहभागी नसल्याने त्यांनी बसेस सुरू ठेवण्याची तयारी दर्शविल्याने काही बसेस रस्त्यावर धावत होत्या. मात्र अंबड, सिडको, सातपूर, त्र्यंबक या ठिकाणी बसेस फिरकल्या नाहीत.

एसटीचे ८० लाखांहून अधिक नुकसान

शहर तसेच ग्रामीण भागातही काही बसेस रस्त्यावर उतरल्या. साधारणत: दिवसाला शहरातील वेगवेगळ्या बस स्थानकांवरून हजार ते बाराशे बसेसच्या फेऱ्या होतात. जिल्ह्यात वेगवेगळ्या आगारांत हा आकडा हजार-दीड हजार फेऱ्यांच्या घरात आहे. आजच्या संपामुळे ८० लाखहून अधिकचे नुकसान झाले असून उद्या या संदर्भातील आकडेवारी स्पष्ट होईल.

– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ

खासगी प्रवासी वाहतूकदार मदतीला

प्रादेशिक परिवहन विभागाने संप काळात समन्वयाची भूमिका स्वीकारत मुख्य बस स्थानकांवर वायू-वेग पथकाच्या आधारे गस्त घालत परिस्थितीचा आढावा घेतला. खासगी बस वाहतूकदारांशी संपर्क साधत सेवा देण्याचा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत चौधरी यात्रा कंपनी, बेनीवाल ट्रॅव्हल्स, सपकाळ नॉलेज हब, शाळा-महाविद्यालयांमधील बसेस ठक्कर बाजार स्थानकावर आणण्यात आल्या. दुपारनंतर पुणे, धुळे, शिरपूर, मालेगावसह अन्य ठिकाणी खासगी बसच्या मदतीने सेवा सुरू करण्यात आली. ५० प्रवासी असतील, त्या गावासाठी बस सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यासाठी तिकीट दर हा राज्य परिवहन महामंडळाच्या बस इतकाच आकारण्यात आला. चौधरी यात्रा कंपनीने खाजगी बसेस त्र्यंबकेश्वर, वणी तसेच दिंडोरी परिसरात मोफत बस सेवा दिली. मंगळवारी दुपापर्यंत २० बसेस पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन चौधरी यात्रा कंपनीने ४८ बसेस रस्त्यावर उतरविल्या. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर मोफत सेवा देताना नाशिक-पुणे, नाशिक-धुळे, साक्री व नंदुरबार, नाशिक-औरंगाबाद या मार्गावर अनेक बसगाडय़ा सोडण्यात आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, एसटी बसच्या तिकिटाच्या तुलनेत निम्मा दर आकारत चौधरी यात्रा कंपनीने प्रवाशांची वाहतूक केली. या बाबतची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी व महेंद्र चौधरी यांनी दिली.