पंडित कॉलनीत स्मार्ट सिटी कार्यालय; तीन पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती

नाशिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून केपीएमजी अ‍ॅडव्हायजरी कंपनीची नियुक्ती करतानाच कंपनीच्या पाचपैकी तीन महत्त्वाच्या पदांवर परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी पंडित कॉलनीतील महापालिकेची इमारत देण्याचे निश्चित करण्यात आले.

स्मार्ट सिटीसाठी स्थापन झालेल्या कंपनीची तिसऱ्या बैठकीस गुरुवारी अध्यक्ष सीताराम कुंटे, आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर रंजना भानसी यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. बैठकीतील चर्चा व निर्णयाची माहिती कुंटे यांनी दिली. सभागृह नेता दिनकर पाटील यांचा कंपनीच्या संचालक मंडळात समावेश झाला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करण्याची पाच कंपन्यांची इच्छा होती. तांत्रिक व आर्थिक निकष तपासून केपीएमजी बहुराष्ट्रीय कंपनीची निविदा पात्र ठरली. ही कंपनी प्रकल्प सल्लागार म्हणून काम करणार आहे. कंपनीच्या पाच महत्त्वाच्या पदांपैकी तीन पदांवरील निवड करण्यात आली. त्यात कंपनी सचिवपदी महेंद्र शिंदे, मुख्य लेखा अधिकारीपदी बाबूराव निर्मळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून प्रमोद गुजर यांची नियुक्ती करण्यात आली. परसेवेतून हे अधिकारी कंपनीतील आपल्या पदांची धुरा सांभाळणार आहेत. बांधकाम अभियंता व नगररचनाकार या पदांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.

चार महिन्यात कार्यालय कार्यान्वित

स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली. पंडित कॉलनीत महापालिकेची भव्य इमारत आहे. ही इमारत आता स्मार्ट सिटी कार्यालय म्हणून ओळखली जाईल. चार महिन्यांत या ठिकाणी कार्यालय कार्यान्वित करण्यात येईल.

केंद्राकडून आतापर्यंत १४५ कोटीचा निधी प्राप्त

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राकडून आतापर्यंत १४५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पांतर्गत महाकवी कालिदास कला मंदिराचे नूतनीकरण महात्मा फुले कला दालन आणि नेहरू उद्यानाच्या प्रकल्पांना आधीच मान्यता देण्यात आली आहे. त्यातील महाकवी कालिदास कला मंदिराचे नूतनीकरण व महापालिकेचे विविध दाखले ऑनलाइन देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन २७ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.