जागृत सुजाण नागरिक संघाची मागणी
शहरालगत होणाऱ्या ‘सुला फेस्ट’ महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, शनिवार व रविवार या दोन दिवसात शहरातून शेकडो वाहने मार्गस्थ होणार
असून या काळात मद्यपींचा धांगडधिंगा, शांततेचा भंग आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी खास मोहीम राबवावी, अशी मागणी जागृत सुजाण नागरिक संघाने केली आहे. या बाबतचे निवेदन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहे.
नाशिक हे तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून अवघ्या जगात परिचित असून सुला महोत्सवामुळे त्यास छेद मिळणार असल्याचे संघाने म्हटले आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी शहरालगत हा महोत्सव होत आहे. त्यात देशभरातून हजारो नागरीक सहभागी होण्याचा अंदाज आहे. तसे संयोजकांनी जाहीर केले आहे. देशभरातून येणारे हे नागरिक वाइन वा मद्यपान करतील. या काळात शहरात त्यांची शेकडो वाहने मार्गस्थ होतील. परतीच्या
प्रवासात त्यांच्याकडून शहरातील शांततेला बाधा येईल असे कृत्य घडू शकते. मद्यपान करत भरधाव वेगाने वाहने शहरातील विविध रस्त्यांवरून मार्गस्थ होतील. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही असे संघाने म्हटले आहे.
मद्यपान करून वाहन चालविणे म्हणजे मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन आहे. उपरोक्त कालावधीत अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जागोजागी पथकांची नेमणूक करून प्रभावीपणे कारवाई करावी अशी मागणी संघाचे संजय करंजकर, रमेश कुशारे आदींनी केली आहे.
या दृष्टिने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.