तारीख देण्यासाठी दोनशे रुपयांची मागणी
न्यायालयीन खटल्यात पुढील तारीख देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी नाशिकरोडच्या दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयातील वरिष्ठ लिपिक संजय शिरसाठ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले.
तक्रारदाराने देवळाली व्यापारी बँकेकडून कर्ज घेऊन दुचाकी खरेदी केली होती. या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकेने त्यांच्याविरुद्ध नाशिकरोड येथील दिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) दावा दाखल केला आहे.
तक्रारदार सोमवारी न्यायालयात गेले असता त्यांनी वरिष्ठ लिपिक शिरसाठची भेट घेऊन तारीख लांबणीवर टाकण्याची विनंती केली. त्या वेळी शिरसाठ यांनी २०० रुपये दिल्यास पुढची तारीख देता येईल असे सांगून लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर लगेचच सापळा रचण्यात आला.
दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या जिन्यात ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरसाठ यास ताब्यात घेतले. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणी अधिकारी वा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना तक्रार करण्यासाठी विभागाने १०६४ हा टोल फ्री क्रमांकाची सुविधाही उपलब्ध केली आहे.