राज्यात तापमानात वाढ झाल्याने उकाडाही प्रचंड वाढला आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक घराच्या गच्चीवर झोपतात. मात्र, नाशिकमधील एका कुटुंबाला घराच्या गच्चीवर झोपणे चांगलेच महागात पडले आहे. घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. तब्बल दोन लाख ९५ हजारांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला आहे. मंगळवारी (ता. २८) ही चोरीची घटना घडली.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. त्यामुळे सिडको परिसरातील अनेक कुटुंबीय रात्री घराच्या गच्चीवर झोपतात. नाशिक शहरातील सिडको परिसरातील विजयनगरमध्ये संजय निकम राहतात. निकम यांचे कुटुंबीयही सोमवारी रात्री घराला कुलूप लावून गच्चीवर गाढ झोपले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास दूधविक्रेत्याला निकम यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडलेले दिसून आले. त्याने याची माहिती निकम यांच्या कुटुंबीयांना दिली.

शहरातील अंबड परिसरात संजय यांचा चहाचा स्टॉल आहे. त्यांची शेतीदेखील आहे. मक्याच्या विक्रीतून मिळालेले अडिच लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे दागिने असा एकूण दोन लाख ९५ हजारांचा मुद्देमाल त्यांनी स्वयंपाक घरातील डब्यात ठेवले होते. चोरट्यांनी ते लांबवले आहेत. या प्रकरणी निकम यांनी तक्रार दिल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.