पंधरा दिवसांत अडचणी सोडविण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरण राज्यात गाजत असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना अखेर सोमवारी या रुग्णालयास भेट देण्यास वेळ मिळाला. पालकमंत्र्यांसोबत भाजपचे पदाधिकारीही आले. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न गंभीर असून तो सोडविण्यासाठी सीएसआर निधीमधून सद्य:स्थितीत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातील. तसेच १५ दिवसांत सर्व तांत्रिक अडचणी सोडविल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूचा प्रश्न गेल्या १५ दिवसांपासून चर्चेत असून या काळात आरोग्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. नाशिकचे पालकत्व भाजपच्या मंत्र्यांकडे आहे. या कालावधीत भाजपचे कोणी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी रुग्णालयाकडे फिरकले नव्हते. यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर ताशेरे ओढल्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली; परंतु या वेळी पक्षाचे आमदार अनुपस्थित होते.

रुग्णालयातील स्वच्छता, आवश्यक औषधसाठा, स्वाइन फ्लू रुग्ण, नवजात बाल शिशू कक्ष आदी कक्षांची महाजन यांनी माहिती घेतली. वृक्ष प्राधिकरणामुळे रखडलेल्या माता व बाल संगोपन कक्षाच्या कामासंदर्भात रुग्णालय परिसराची पाहणी करत कायदेतज्ज्ञांना त्यांनी सूचना केल्या. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाजन यांनी रुग्णालयात इतके दिवस आलो नसलो तरी दैनंदिन आढावा घेत असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे प्रत्यक्ष येण्याची गरज भासली नाही. रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णालयाच्या अडचणी माहीत असल्याने सीएसआर निधीतून ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. नवजात बालमृत्यूस बेबी वॉर्मरची कमतरता हे मुख्य कारण असल्याने पुणे येथील मुकुल माधव ट्रस्ट व अन्य उद्योजकांच्या मदतीने सीएसआर निधीतून ६० लाखांचा निधी मिळवण्यात आला आहे. त्यातून तात्काळ १८ बेबी वॉर्मर, १० फोटोपेटी, १५ ऑक्सोमीटर, २० सिरींज पंप, १ बेबी रूबीओ मीटर, मोबाइल एक्सरे मशीन बसविण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिकेत १७ बेबी वॉर्मर असून त्या ठिकाणी २३ ‘बेबी वॉर्मर’ खरेदी करण्याची सूचना देण्यात आली आहे. दुसरीकडे, स्वाइन फ्लू रुग्णांची वाढती संख्या पाहता अतिदक्षता कक्षात पाच ‘व्हेंटिलेटर’ बसविण्यात येणार आहेत. तसेच सीएसआर निधीतून ५ व्हेंटिलेटर बसविण्याचा प्रयत्न आहे. बालमृत्यूचे मूळ गरोदर मातांचे कुपोषण, आरोग्याची झालेली हेळसांड यामध्ये आहे. त्यांच्यासाठी गांभीर्याने काही करण्याची गरज असून यंत्रणा त्या दृष्टीने सक्रिय राहील, असे ते म्हणाले. जिल्ह्य़ातील आरोग्याचा प्रश्न पाहता येथील संदर्भ रुग्णालयाची जागा ही सरकारमान्य वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी, असा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास ९०-१०० तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता होऊ शकेल. तसेच ग्रामीण भागातील आरोग्यविषयक अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात पॅ्रक्टिस देणे बंधनकारक करण्यात आले असून लवकरच तसा आदेश निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील रिक्त पदे लवकर भरण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारीही रुग्णालयात

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी या समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहत नसल्यावर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता. नवजात बालकांच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर त्यांनी रुग्णालयास भेट दिली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन महसूल आयुक्त महेश झगडे यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीच्या आमदाराने जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला होता. रुग्ण कल्याण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांची वेळ मिळत नसल्याने अनेकदा पुढे ढकलावी लागली. या पाश्र्वभूमीवर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे पालकमंत्र्यांच्या भेटीवेळी रुग्णालयात हजर झाले. या पंधरवडय़ात त्यांचे प्रथमच दर्शन झाल्याची प्रतिक्रिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. पालकमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी नवजात शिशू कक्षास भेट देत माहिती घेतली.