साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचा योग साधण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे बाजारपेठ फुलल्याचे पाहावयास मिळाले. सराफ व्यावसायिकांच्या संपामुळे मागील काही मुहूर्त हुकले होते. त्याची कसर सोमवारी अनेकांनी सोन्याची खरेदी करीत भरून काढली. सोन्याच्या चढत्या दरामुळे ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची व्यावसायिकांची भावना होती. दुसरीकडे घर खरेदी, वाहन तसेच अन्य काही खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल होता. दरम्यान, अक्षय्यतृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणाऱ्या ग्राहकांना या दिवशी आंबे खरेदी करताना काहीसा हात आखडता घ्यावा लागला. यामुळे उत्साहात फरक पडला नसला तरी खरेदीचे प्रमाण मात्र काहीसे कमी झाले.
या दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे त्याचे दर किमान या दिवशी तरी चढेच राहतात, असा आजवरचा अनुभव. गेल्या काही महिन्यांपासून सराफ व्यावसायिकांचा संप आणि त्यातही दरात चढ-उतारांची शृंखला सुरू असली तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने-चांदी खरेदीला अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्राधान्य दिले. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे सराफ बाजार झळाळल्याचे पाहावयास मिळाले.
सराफ व्यावसायिकांच्या संपामुळे दोन महिन्यांतील गुरुपुष्यामृत आणि गुढी पाडव्याचा मुहूर्त चुकल्याने अनेकांनी हा मुहूर्त साधला. सोन्याचा प्रति तोळे भाव ३० हजार ५० रुपयांवर गेल्यामुळे काहींचा हिरमोड झाला. यामुळे वनग्रॅम गोल्डसह अन्य काही पर्याय ग्राहकांनी स्वीकारले. आर. सी. बाफना, राजमल लखिचंद, महावीर ज्वेलर्स आडगावकर व टकले सराफ, जाखडी ज्वेलर्स, नाशिक रोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये ‘हॉलमार्क’ असणारे चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी व बिस्किटांचा समावेश होता. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी व्यावसायिकांनी घडणावळीत सूट यासह काही खास सवलती दिल्या. खरेदीचे वातावरण असले तरी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
खरेदीचा मुहूर्त काहींनी वास्तू खरेदी तर काहींनी वास्तूसाठी गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करीत साधला. घरातील सजावटीसाठी लाकडी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू या बाजारपेठेत उभारी आल्याचे दिसले. या दिवशी वाहन खरेदीतही चांगलाच उत्साह होता. या दिवशी बाजारपेठेत कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली.
दुसरीकडे, अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे घागर पूजत नैवेद्य म्हणून आमरस आणि पुरणपोळीचा बेत आखला जातो. बाजारात हापूस, केसर, लालबाग असे काही मोजकेच प्रकार दाखल झाले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे यंदा बोटावर मोजता येतील इतकेच पर्याय शिल्लक राहिल्याने आणि त्याचा परिणाम भावावरही झाला. यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांना विचार करणे क्रमप्राप्त ठरले.
हापूस, केसर अन् लालबाग या तीन प्रकारच्या आंब्यांवर हा सण साजरा करावा लागल्याचे पाहावयास मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे, आवक मुबलक नसल्याने आंब्याचा स्वाद चाखण्याकरिता खिसा खाली करण्याची तयारी ठेवणे भाग पडले. केसर व लालबागचा किमान दर ६० ते १०० रुपये तर हापूस आकारमानानुसार ३०० ते ५०० रुपये डझन होता.