एकीकडे गोविंदा रे गोपाळा . मच गया शोर सारी नगरी मे.. अशी वेगवेगळी गीते तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड.. शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात जन्माष्टमीचा सोहळा पार पडला. विविध वेशभूषा करत शाळेत आलेल्या बालकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. काही मंडळांनी आपापल्या भागात लहान दही हंडय़ांचे आयोजन केले होते. परंतु, त्यांची उंची अगदीच कमी असल्याने न्यायालयाच्या निर्देशांच्या उल्लंघनाचा प्रश्न नव्हता. मुंबईप्रमाणे दणक्यात हा सण नाशिकमध्ये साजरा होत नसल्याने पोलीस यंत्रणाही निश्चित होती.

शहर व परिसरात दही हंडीचा उपक्रम प्रामुख्याने शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला. सर्व शाळांमध्ये दही हंडीची जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळपासून घराघरातून कृष्ण व राधाच्या वेशभूषेत चिमुकले बाहेर पडू लागले. शाळेतील सभागृहात वा मोकळ्या मैदानात दही हंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोविंदा व गोपाळा सारख्या गितांची धूनही सुरू केली गेली. शिक्षकांच्या मदतीने ठिकठिकाणी बाळगोपाळांनी दही हंडय़ा फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. शहरात काही मंडळांनी या उपक्रमाचे आयोजन केले. नाशिकमध्ये मुंबईप्रमाणे उंची दही हंडय़ांची परंपरा नाही. खास दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकेही नाहीत. यामुळे मंडळांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात स्थानिक युवक हे गोविंदा बनले.

या हंडय़ांची उंची जेमतेम होती. न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन होईल अशी स्थिती नसल्याने पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला नाही. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांबरोबर यश फाऊंडेशन आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या सहकार्याने आयोजित उपक्रमात एचआयव्हीबाधित विद्यार्थी व पालकांनी सहभागी होत जन्माष्टमीचा आनंद घेतला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे कॅप्टन सी. एन. बॅनर्जी, फाऊंडेशनचे रवींद्र पाटील, नामदेव येलमामे उपस्थित होते. सातपूर येथील महिंद्राच्या आवारात असलेल्या ‘हरियाली’ परिसरात एचआयव्ही ग्रस्त बालके, त्यांचे पालक यांना एकत्रित आणण्यात आले. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी सजविण्यात आली. तिचे पूजन करत बालगोपाळांपैकी एका बालकृष्णाने हंडी फोडण्याचा प्रयत्नही केला. मात्र पुढच्या थरासाठी खास गोपिकांचा चमू एकत्र आला. त्यांनी एक थर तयार करत हंडीतून नारळ बाहेर काढत ती फोडली. यावेळी सर्वानी ‘गोविंदाचा’ गजर करत गोपाळ काल्याचा आनंद लुटला. दरम्यान, दहीहंडी सोहळा झाल्यानंतर एचआयव्हीग्रस्त नवविवाहित महिलेच्या ओटीभरणाचा कार्यक्रम पार पडला.