आ. प्रा. देवयानी फरांदे यांचा अहवाल

शहरातील कमी उंचीचे पूल हटवून त्या जागी महत्तम पूर पातळी लक्षात घेऊन नव्या पुलांची उभारणी.. सखल नदीपात्राच्या परिसरात नदीला समांतर संरक्षक भिंत बांधणे.. गोदावरी व नासर्डी नदीवरील बंधारे हटविणे.. केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राने सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी.. या कायमस्वरूपी उपायांच्या माध्यमातून गोदावरी आणि तिच्या इतर उपनद्यांच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात पुरामुळे होणारे नुकसान टाळता येईल. नाशिकला २००८ आणि २०१६ मध्ये महापुराला तोंड द्यावे लागले. त्यात कोटय़वधींचे नुकसान झाले. या पाश्र्वभूमीवर, गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत केलेल्या अभ्यासाची माहिती आ. देवयानी फरांदे यांनी अहवालाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली आहे. उपरोक्त उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने संबंधित यंत्रणांची बैठक घ्यावी तसेच या कामांसाठी निधीची उपलब्धता करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या अनुषंगाने पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीसह इतर लहान-मोठय़ा नद्यांना महापूर येऊन त्याचा सर्वाधिक फटका नाशिक शहराला सहन करावा लागला. आठ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये नाशिकला महापुराच्या संकटाला तोंड द्यावे लागले होते. या वेळी शहरातील अनेक भाग पाण्याखाली बुडाले. नदीकाठालगतच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे भाग पडले. नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक स्वरूपात मदत दिली. पावसाळ्यात स्थानिकांवर हे संकट कोसळण्याचे नेहमी सावट असते. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण भागाचा अभ्यास करून तयार केलेल्या अहवालाची माहिती शुक्रवारी आ. फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २००८ च्या महापुरानंतर शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पूररेषेची आखणी केली गेली. गोदावरीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी पात्राबाहेर पडण्यास वेळ लागत नसल्याचे समोर आले. पुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून तेव्हा उपाय सुचविण्याचे काम पुण्याच्या केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राला देण्यात आले होते. त्यासाठी साडेसात लाख रुपयांचे शुल्कही महापालिकेने दिले. उपरोक्त संस्थेने सादर केलेल्या अहवालात नदीपात्रातील बंधारे काढणे, पात्रातील गाळ काढणे ही कामे केल्यास गोदावरीची निळी पूररेषेची पातळी ३ मीटरने तर नासर्डी नदीची पातळी १.८६ मीटरने कमी होणार असल्याचे म्हटले आहे.

नदीकाठावरील परिसराची पाहणी केल्यावर पात्रातील कमी उंचीचे पूल, बंधारे, मातीचे उंचवटे यामुळे पाणी पात्रालगतच्या परिसरात पसरत असल्याचे निदर्शनास आले. उंटवाडीलगतच्या नासर्डी पुलाच्या खाली बीमची खोली अधिक असल्याने वहन क्षमता कमी झाल्याचे लक्षात आले. नासर्डी नदीवरील अंबड लिंक रोड, मुंबई-आग्रा महामार्गावरील पूल आणि नाशिक-पुणे रस्त्यावरील जुना पूल हे तीन पूल वगळता सर्व पूल पुराच्या पाण्याखाली जातात. परिणामी, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन ते आसपासच्या भागात पसरते. याच नदीवर जुने ब्रिटिशकालीन बंधारे आहेत. त्यांचा आता शेतीसाठी वापर होत नसल्याने त्या बंधाऱ्यांची गरज नाही. गोदावरी नदीवरील आनंदवल्ली व होळकर पुलाजवळील बंधाऱ्यांची वेगळी स्थिती नाही. थेट पाणी पुरवठा योजनांमुळे त्या बंधाऱ्यांची गरज राहिलेली नाही. गोदावरील नदीवरील आनंदवलीजवळील जुना पूल, आसाराम बापू आश्रमालगतचा पूल, वन विभाग रोपवाटिका पूल, रामवाडी, दहीपूल, गाडगे महाराज पूल, स्मशानभूमीलगतचा पूल हे सर्व पूल महत्तम पूर पातळीपेक्षा खाली बांधले गेल्याने पाण्यात बुडतात. गोदावरीच्या उजव्या बाजूकडील क्षेत्र खाली असल्याने आसपासच्या परिसरात लवकर पाणी शिरते, असे अनेक मुद्दे समोर आल्याकडे फरांदे यांनी लक्ष वेधले. पुरामुळे दरवर्षी हे संकट ओढावण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. शासनालाही वेळोवेळी नुकसानग्रस्तांना मदत द्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन पुराची तीव्रता कमी करण्यासाठी अभ्यासांती कायमस्वरूपी उपाययोजना सुचविणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्याचे फरांदे यांनी नमूद केले.