कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेसंबंधातील येथील विवाह सोहळ्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या जंगी विवाह सोहळ्यास लोकप्रतिनिधींसह बुकी अन्य मान्यवर मंडळींसह पोलिसांनी हजेरी लावली. उपरोक्त विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

कुख्यात गुंड दाऊदच्या नातेसंबंधातील मुलीचा विवाह येथील एका युवकाशी अलिशान स्थळावर पार पडला. या सोहळ्याचे निमंत्रण मुस्लीम धर्मगुरुंमार्फत भद्रकाली पोलीस ठाण्यासह शहरातील अनेक मान्यवरांना देण्यात आले होते. त्या विवाह सोहळ्यास आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांसह काही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बाबतची माहिती उघड झाल्यानंतर एकाने थेट समाजमाध्यमांवर तक्रार करत गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कुटूंबियाच्या विवाह सोहळ्यास पोलिसांची कशी उपस्थिती लावली असा प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले जाते. पोलीस अधिकाऱ्यांबरोबर या सोहळ्यास आमदार, नगरसेवक व इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगितले जाते. उपरोक्त सोहळ्यास हजेरी लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची अंतर्गत पातळीवर चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले. मंगळवारी मालेगावची महापालिका निवडणूक असल्याने तसेच त्यातील काही व्यक्ती रजेवर असल्यामुळे चौकशीबाबत फारशी प्रगती होऊ शकली नाही. दोन दिवसात चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सूचित केले.