उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्पात असतांना यंदा भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘डिफिब्रिलेटर’ हे अत्याधुनिक यंत्र बसविण्यात येणार आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजनांचा आढावाही घेण्यात येत आहे.

साडे तीन पीठापैकी एक असलेल्या सप्तशृंग देवस्थानाचे वैशिष्टय़ म्हणजे डोंगर माथ्यावरची चढाई. देवीचे मंदिर डोंगराच्या माथ्यावर असल्याने भाविकांना शेकडो पायऱ्या ओलांडत दर्शनासाठी जावे लागते. या चढाईचा अबालवृद्धांना त्रास होतो. काहींना तर हृदयविकाराचा झटकाही येतो. ही बाब लक्षात घेऊन हृदयावर ताण आल्यानंतर प्राथमिक परिस्थितीत उपचार करता येणारे ‘डिफिब्रिलेटर’ हे यंत्र लायन्स क्लब नाशिक-पंचवटी आणि आकुर्डी सफायर यांच्या सहकार्याने गडावर बसविण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी माजी प्रांतपाल हसमुख मेहता, नाशिक प्रकल्पाचे प्रमुख वैद्य विक्रांत जाधव, अध्यक्षा नीलिमा जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. अशा प्रकारची यंत्रणा भारतात देवस्थान परिसरात पहिल्यांदाच कार्यान्वित होत आहे. यासाठी गडावरील २० कर्मचाऱ्यांना यंत्राची संपूर्ण ओळख व प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे भाविकांना आरोग्यदृष्टया महत्वाची सेवा दिली जाणार आहे.

नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर होणाऱ्या शारदीय महोत्सवात दिवसाकाठी २५ ते ३० हजार भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे. पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील यांनी भेट देत गड परिसराची पाहणी केली. नवरात्रोत्सवात दोन हजाराहून अधिक महिला नवसपूर्तीसाठी घट बसवतात. वेगवेगळ्या भागातून हजारो कावडीधारक दर्शनासाठी गडावर येतात. वाहतुकीची कोंडी होऊनये व गर्दीचे नियोजन, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी याबाबतचे नियोजन सुरू असून सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षक, मंदिर समितीचे स्वयंसेवक असे त्रिस्तरीय कडे उभारले जात आहे. मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने मंदिराची स्वच्छता, डागडुजी व रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या उत्सवात ‘व्हॅर्नाक्युलर ट्रॉली’चा मुहूर्त काही तांत्रिक कारणास्तव चुकला असून येत्या तीन ते चार महिन्यात ही सेवा भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.