‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अंतिम टप्प्यात नाशिकची निवड होण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून या योजनेत नाशिककरांचा सहभाग वाढविण्यासाठी सध्या कार्यशाळांचा धडाका लावला आहे. याअंतर्गत रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यशाळेत जुन्या नाशिकसह पंचवटीतील गोदाकाठचा भाग, मखमलाबाद भागाचा कसा विकास होऊ शकतो, याचे ‘स्वप्नरंजन’ करण्यात आले. जुन्या नाशिकमधील गल्ल्यांमधील बाजारपेटेत खरेदीचा आनंद, जुन्या नगरपालिका इमारतीमध्ये होणाऱ्या संग्रहालयात नाशिकच्या वैभवाचे प्रदर्शन, वाघाडी नाल्यालगतच्या पदपथावर भटकंती, असे सर्व काही पालिका प्रशासनाने क्रिसिल संस्थेच्या माध्यमातून तयार केलेल्या प्रस्तावात मांडले आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या प्रस्तावासंदर्भात कार्यशाळेत माहिती दिली. स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम फेरीसाठी महापालिकेकडून तीन डिसेंबपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर होणे आवश्यक आहे. या प्रस्तावासाठी महापालिकेने क्रिसिल या संस्थेला सुमारे सव्वा कोटी रुपये मोजले असून संस्थेने तयार केलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा, यांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांसमोर करण्यात आले. प्रस्तावात जुन्या नाशिकमध्ये पदपाथ, गोदावरी नदीकाठच्या दोन्ही बाजूंना सायकल मार्ग, त्यास जोडणारे इतर रस्ते, गोदाकाठ परिसरात पर्यटन व विरंगुळा केंद्र, अरुंद गल्ल्यांमध्ये बाजारास उत्तेजन, दगडी पेव्हर ब्लॉकने परिपूर्ण महत्त्वपूर्ण रस्ते, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंसमोर ‘हेरिटेज वॉक’, खासगी विकास कामांमार्फत काझीगढीचा विकास या कामांचा समावेश आहे. मखमलाबाद, तपोवन, हनुमानवाडी या परिसराचा हरित क्षेत्रअंतर्गत विकास केला जाईल. आनंदवल्ली बंधारा ते रामवाडी पुलापर्यंत ‘शॉपिंग मॉल्स’ उभे करण्यात येणार आहेत. पूररेषेतील बांधकामांना अभय मिळण्याची आशा वर्तविण्यात आली आहे. संपूर्ण जुन्या नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी नमूद केले. आयुक्तांचे सादरीकरण होत असताना आ. देवयानी फरांदे यांनी काही गोष्टींना आक्षेप घेत बोलण्यास सुरुवात करताच नागरिकांनी त्यांना आपण आयुक्तांचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो असल्याने शांत बसा, अशी सूचना केली. उपमहापौर गुरूमित बग्गा यांच्यासह इतर अनेकांनी आपले मत मांडले.