उर्वरित शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गास ८० टक्के ठिकाणी विरोध नाही. त्यामुळे ७०० पैकी ६७० किलोमीटरची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे चर्चेद्वारे समाधान करूनच जमीन घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले. एक जूनपासून संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांशी शासन चर्चा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री समृध्दीबाधीत व इतर शेतकरी संघटनांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले गेले होते. तथापि, विश्रामगृहाकडे मुख्यमंत्री फिरकलेच नाहीत. त्यामुळे संघर्ष समिती व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत समृध्दी महामार्गाबाबत भूमिका मांडली. यावेळी सिन्नर तालुक्यातील ज्या शिवडे गावात बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेटी दिल्या, त्या गावाचे नांव न घेता तेथील स्थिती मांडली. संबंधित गावात केवळ १४ शेतकऱ्यांची ३८ हेक्टर शेतजमीन समृध्दी महामार्गासाठी घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मोजणीला विरोध झाला, तिथे मोजणीच करण्यात आलेली नाही. परंतु, मोजणी होऊ दिली नाही तर प्रत्यक्षात बाधीत शेतकरी व क्षेत्र कसे कळणार? विरोध करणाऱ्यांनी मोजणी होऊ द्यावी. जमीन द्यायची की नाही, ते नंतर ठरवावे. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचे चित्र या महामार्गामुळे बदलणार आहे. हा महामार्ग न होणे उपरोक्त भागांसाठी नुकसानीचे ठरणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बहुतांश ठिकाणी या महामार्गास पाठिंबा आहे. त्यामुळे केवळ ३० किलोमीटर वगळता मोजणीचे काम सर्वत्र पूर्णत्वास गेले. विरोध असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे शेतकऱ्यांशी चर्चा करीत असून काहींशी याआधी चर्चा झाली आहे. उर्वरित घटकांचेही म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाठ, संघटनांकडून निषेध

भगूर येथे सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या ठिकाणी समृध्दीबाधीत शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जमले होते. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून गांधी टोपी परिधान करून आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरून ताब्यात घेतले. कार्यक्रम होईपर्यंत संबंधितांना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे दिवसभरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली जाईल, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विश्रामगृहात समृध्दीबाधीत शेतकऱ्यांसह प्रहार संघटना, शेतकरी वाचवा अभियान, शेतकरी संघटना, किसान क्रांती आंदोलन, वारकरी आदी संघटनांचे प्रतिनिधी आपले निवेदन देण्यासाठी जमले होते. परंतु, महापालिकेतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री विश्रामगृहाकडे आलेच नाही. आश्वासन देऊनही शेतकरी व समृध्दीबाधितांचे म्हणणे ऐकून न घेतल्याच्या निषेधार्थ शेतकरी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला.