देवळाली कॅम्प येथे सप्टेंबरमध्ये भरती

राष्ट्रप्रेमाची उर्मी मनी बाळगणाऱ्या आणि देशाची सेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना भारतीय लष्कराने सैन्य दलात सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्या अंतर्गत ६ ते २५ सप्टेंबर २०१६ या कालावधीत देवळाली कॅम्प येथे लष्करी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वैशिष्ठय़े म्हणजे, ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेपासून ते उमेदवारांना शारीरिक चाचणीची नियोजित तारीख कळविण्यापर्यंत अशी संपूर्ण व्यवस्था ‘ऑनलाईन’ करण्यात आली आहे. याद्वारे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या बाबतची माहिती सैनिकी रोजगार केंद्राचे (मुंबई) कर्नल नवदीप कदियान यांनी दिली. नाशिकसह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील तरूणांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त करणाऱ्या इच्छुकांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती २१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करतील, केवळ त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. संबंधितांना कोणत्या दिवशी भरती प्रक्रियेतील शारीरिक तंदुरुस्ती व चाचणीसाठी उपस्थित रहायचे आहे, त्याची तारीखही ऑनलाईन पध्दतीने कळविण्यात येणार असल्याचे कादियान यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्ज ‘डब्लूडब्लूडब्लू.जॉईनइंडियनआर्मी.एनआयसी.इन’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या निमित्ताने लष्कराने ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत अर्ज नोंदणी, जमा करणे आणि तत्सम बाबी आपल्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने करत ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विहित निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने मिळणाऱ्या प्रवेश पत्रावर कोणत्या दिवशी उपस्थित रहायचे आहे याची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी व तंदुरुस्ती चाचणी आणि उंची व वजन मापन आदी पार पडेल. जिल्हा सैनिक मंडळांकडून उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी मुंबईच्या सैनिकी रोजगार केंद्रात अथवा ०२२-२२१५३५१० या क्रमांकावर संपर्क साधावा. भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने होणार असून केवळ गुणवत्तेच्या आधारावर निवड होणार आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या सेवेत सहभागी होण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली असून तिचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.