आज निवडणूक

जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण जुळवण्यासाठी सोमवारी उशिरापर्यंत सेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी-भाजप यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरू असल्याने उभयतांनी उमेदवारांचे पत्ते अखेरच्या क्षणी थेट सभागृहात उघडण्याचे धोरण स्वीकारले आहे. महापालिका निवडणुकीत सेना-भाजप या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये उफाळून आलेले वैमनस्य जिल्हा परिषदेतही कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी विचारांच्या पक्षांना जवळ करीत सत्ता काबीज करण्याचे मनसुबे आखले आहेत. त्यात अखेर कोणाला यश येईल, याची स्पष्टता मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून होणार आहे.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक २५ जागा जिंकून शिवसेना हा मोठा पक्ष ठरला. त्या खालोखाल राष्ट्रवादी १८, भाजप १५, माकप तीन आणि अपक्षांचे चार असे बलाबल आहे. त्यातील एक अपक्ष भाजपकडे तर दुसरा अपक्ष राष्ट्रवादीच्या गटात समाविष्ट झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत जिल्हा परिषदेत सेनेला पाठिंबा दिला जाईल, असे जाहीरपणे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीची घटिका जवळ आल्यानंतर राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी दर्शविली आहे. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न न करता काँग्रेस, माकप व अन्य दोन अपक्षांच्या मदतीने सत्तेचा सोपान चढण्याची तयारी केली. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य हे एकत्रितपणे इगतपुरी येथे मुक्कामी आहेत तर सेना-काँग्रेस व अपक्ष हे सदस्य मंगळवारी थेट निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद सभागृहात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मागील पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. संख्याबळात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भाजप-राष्ट्रवादीमध्ये सकारात्मक बोलणी सुरू असून ज्याच्याकडे अधिक संख्याबळ आहे, त्याचा उमेदवार अध्यक्षपदासाठी राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी सांगितले. उपाध्यक्षपद पदरात पाडून सेनेला रोखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नावही आधी जाहीर केले जाणार नसल्याचे त्यांनी सूचित केले. शिवसेनेने आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला हुलकावणी दिली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसने सेनेसोबत जाण्याची तयारी केली आहे. या एकंदर स्थितीत अखेरच्या क्षणी सेना-भाजप युती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचा भ्रमनिरास होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या एकंदर स्थितीत प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

माकपच्या  भूमिकेला महत्त्व

निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्याचे धोरण अनुसरण्यात आले. सेना-काँग्रेस व अपक्ष मिळून सदस्यसंख्या ३८ वर जाते तर राष्ट्रवादी-भाजपकडे एकूण ३५ संख्याबळ आहे. या स्थितीत माकपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उभय गटांकडून माकपला मनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला.