एसटी कामगार सेना मेळावा

कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटला की, नेत्यांचा जयजयकार, घोषणाबाजी आणि काहीसा गोंधळ नेहमीचाच भाग. कार्यकर्त्यांचा उत्साह जसा महत्त्वाचा आहे तसे त्यास आवर घालणेही गरजेचे. शिवसेना एसटी कामगार सेनेच्या वतीने शुक्रवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थितांच्या उत्साहाला आयोजकांना लगाम घालता आला नाही. शेवटी रावते यांनी आपल्या भाषणात अशा उत्साही जनांचा चांगलाच समाचार घेतला.

येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात एसटी कामगार सेनेने मेळाव्याचे आयोजन केले होते. यासाठी राज्यभरातून कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली. कार्यक्रम सुरू असताना घोषणाबाजी, पक्ष प्रमुखांचा जयजयकार, टाळ्यांचा कडकडाट.. असे करत काहींची हुल्लडबाजी सुरू होती. या उत्साही कार्यकर्त्यांना वेसण घालण्याचे काम रावते यांनी केले. उत्साही कार्यकर्त्यांनी रावते आपल्या दैवताच्या जागी असल्याचे सांगितले. त्यास रावते यांनी शिवसैनिकांचे एकच दैवत बाळासाहेब ठाकरे असून बाकी सर्व कार्यकर्ते असल्याचे सुनावले. अधूनमधून वाक्यागणिक टाळ्या येत होत्या. त्यामुळे समोरचा काय म्हणतो आधी ते ऐकून घ्या अन्यथा त्यास ‘चापलुसी’ म्हणतात, असा टोला रावते यांनी लगावला. एसटी महामंडळाचा कार्यभार स्वीकारल्यापासून कामगारांचे कल्याण या एकाच ध्येयाने काम केले जात आहे. परिवहन महामंडळात अनेक चुकीच्या गोष्टींना पायबंद घालत स्वच्छ प्रशासनाला प्राधान्य देण्यात आले. चालक आणि वाहक यासह अन्य कामगारांच्या भविष्याचा तसेच त्यांच्या गरजांचा विचार करत अनेक निर्णय घेण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आल्याचा दावा रावते यांनी केला. कामगारांच्या आरोग्याचा विचार करत त्यांच्यासाठी संदर्भ सेवा रुग्णालय सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी उपचार खर्चात २० ते २५ टक्के सवलत देण्यात येईल. एसटी महामंडळ नफ्यात येण्यासाठी केलेल्या अभ्यासात प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात आला. यामुळे कोणत्याही डिझेल पंपावर एसटी बसने इंधन भरताना १० मिनिटांहून अधिक काळ थांबू नये अन्यथा शिक्षा करण्यात येईल, प्रत्येक तिकिटामागे १ रुपया जास्त दर लावत कामावर असताना वाहक आणि चालकाचा मृत्यू झाल्यास त्याला १० लाखांचा विमा देण्यात येईल. कुटुंबीयांनी १० लाखांचा विमा किंवा अनुकंपा तत्त्वावर नोकरी याची निवड करायची आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत कामगारांच्या गैरवर्तनाबद्दल नोटिसा देऊन मांडवली करत हा प्रश्न सोडविला जायचा. त्यामुळे त्या कामगाराला कधी घरी बसावे लागले, तर काही वेळा आर्थिक भरुदड सोसावा लागला. ही पद्धत मोडीत काढत वरिष्ठ नेत्यांची लुडबुड थांबवली आहे. वेगवेगळ्या प्रकरणांत घरी बसवलेले १० हजारांहून अधिक कामगार सेवेत पूर्ववत करण्यात आले. कामगारांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, त्यांनी योग्य पद्धतीने सेवा द्यावी, यासाठी वर्षांतून आठ दिवस कुटुंबीयांसहित त्यांचे प्रशिक्षण घेतले जाईल, असेही रावते यांनी नमूद केले.

लवकरच चालक-वाहकांच्या ३५०० जागा भरण्यात येणार असून त्याची जाहिरात १५ दिवसांत प्रकाशित होईल. रावते यांनी महामंडळाच्या त्रुटींकडे लक्ष वेधत कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. या वेळी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांना देत साडेनऊ कोटी रुपयांचा निधी जमा केला. हा निधी मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांना देण्यात आला. त्याबाबत कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले. मेळाव्यास सहकारमंत्री दादासाहेब भुसे, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.