दोन हजार दिवे प्रज्वलित करण्याचा संकल्प

मालेगावच्या झोडगे येथील माणकेश्वर हेमाडपंथी शिवालयात सोमवारी सायंकाळी झोडगे दीपोत्सव साजरा होणार आहे. या उपक्रमाने सर्वदूर पोहोचलेल्या मंदिरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली, शिवाय त्याचे संवर्धनही दृष्टिपथास आले. या वर्षीच्या दीपोत्सवात दोन हजार दिवे प्रज्वलित करण्यासोबत हवेत उडणाऱ्या दिव्यांचाही प्रयोग प्रथमच करण्यात येणार आहे.

दीपावलीच्या प्रकाशपर्वात सर्व परिसर प्रकाशाने उजळून निघत असताना मालेगाव तालुक्यातील झोडगे गावातील ७५० वर्षे जुने यादवकालीन प्राचीन हेमाडपंथी शिवालय मात्र अंधारात राहायचे. दिवाळीचे औचित्य साधून या प्राचीन ऐतिहासिक शिवालयाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी झोडगे दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. शिवालयाचा वारसा सर्वत्र पोहोचविण्यात दीपोत्सवाचा मोठा हातभार लागला. यंदाचे हे सहावे वर्ष आहे. मागील पाच वर्षांचे फलित म्हणजे महाराष्ट्रातील अनेक भागांतून नागरिक हे हेमाडपंथी शिवालय पाहायला येतात. दीपोत्सवाने अनेकांना आकर्षित केले आहे. तसेच हेमाडपंती शिवालयाच्या जतन व संवर्धनाच्या प्रयत्नांनाही यश मिळाले. या संपूर्ण मंदिरावर अलीकडेच रासायनिक प्रक्रियाही करण्यात आली. दीपोत्सवाच्या माध्यमातून ‘दिवा लावू तेजाचा, वारसा जपू शिवालयाचा’ हा संदेश दिला जातो. मागील चार वर्षांपासून १००० दिव्यांनी शिवालय प्रकाशमय झाले होते.

या वर्षी २००० दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर प्रकाशित करण्याचा संकल्प झोडगेकरांनी केला आहे. दीपोत्सवात अधिकाधिक दिवे घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन झोडगे दीपोत्सव परिवाराने केले आहे.

उडत्या दिव्यांचाही प्रयोग

झोडगे दीपोत्सवात मंदिर परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करून परिसर प्रकाशमय होत असतो. यंदा त्यात प्रथमच हवेत उडणाऱ्या दिव्यांचा अनोखा प्रयोग केला जाणार आहे.  जमिनीवर दिव्यांचा तर आकाशातून उडणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात काळ्या पाषाणातील शिवालय पाहण्याचा नेत्रसुखद अनुभव घेता येणार आहे.