उपचारासाठी पर्यायी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सरकारी बाण्याचा फटका

डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असताना हे हाल कमी करण्यासाठी पर्यायी आधार म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रुग्णांनी धाव घेतली; परंतु या रुग्णालयातील कामकाजाची माहिती नसल्याने अनेक रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचा गोंधळ उडाला. रुग्णालयात गैरसोयींसह सरकारी बाणा अनुभवण्यास मिळाल्याने वेदना कमी होण्याऐवजी त्या अधिकच वाढल्याचा अनुभव रुग्णांना आल्याने त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

केवळ संप असल्याने मदत मिळाली नाही म्हणून मित्राला जीव गमवावा लागला. या स्थितीत त्याच्या शव विच्छेदनासाठी ताटकळत राहणारा अस्वस्थ मित्र वर्ग.. पोटात सकाळपासून दुखतेय पण काय झाल हे समजायला मार्ग नाही. काहीही करा पण या दुखण्यातून सोडवा अशी होणारी विनंती.. प्रसुतीच्या असह्य वेदनांनी तळमळणारा एक जीव.. अशा असंख्य रुग्णांची गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालय रुग्णालयात एकच गर्दी झाली.

अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयात प्रथमच आल्याने केस पेपर काढण्यापासून जी धावपळ सुरू झाली ती उपचारापर्यंत सुरू होती. संपामुळे रुग्णांच्या उपचारात हाल होऊ नये यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय सज्ज होते. परंतु, रुग्णालय व्यवस्थापनाने नेहमीचा सरकारी बाणा दाखविल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

रुग्णांची संख्या वाढणार हे माहीत असल्याने जिल्हा रुग्णालयाकडून बाह्य़ रुग्ण कक्षातील कामाची वेळ वाढविण्यात आली. ग्रामीण आरोग्य अभियान, शाळेत नियमित तपासणी करणारे वैद्यकीय पथक यासाठी बोलविण्यात आले. तसेच मुबलक औषधसाठा मागविण्यात आला. याशिवाय सिटी स्कॅन, सोनोग्राफीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले; परंतु प्रत्यक्षात या सुविधांचा लाभ घेताना रुग्णांना त्रास झाला.

विविध वैद्यकीय संघटनांनी  पुकारलेल्या संपांची ग्रामीण भागातील रुग्णांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे व्याधी, असह्य़ वेदनांनी तळमळणारे अनेक रुग्ण शहरातील नामांकित दवाखान्याकडे आले. मात्र बाहेर लावलेले निषेध तसेच बेमुदत बंदच्या फलकांमुळे त्यांच्यात संताप व्यक्त होताना दिसला.

या रुग्णांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली; परंतु तेथेही समाधानकारक सेवा न मिळाल्याने तेथेही त्यांचा संताप  होताना दिसला. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनसह अन्य काही वैद्यकीय संघटनांच्या वतीने डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कॅनडा कॉर्नर येथून मोर्चा काढण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांचा गोंधळ

संपामुळे रुग्णालये बंद होती. त्यामुळे कुठे अन्य डॉक्टर सापडतील का, याची शोधाशोध झाली. पण ती अपयशी ठरली. असह्य़ त्रास होत असल्याने काहींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सरकारी कामाची पद्धत माहिती नसल्याने त्याबाबत सहकार्याची भूमिका कोणी न दाखविल्याने केस पेपर कुठे काढायचा, कोणत्या कक्षात, कितव्या मजल्यावर जायचे याबाबत गोंधळ उडाला. अनेकांना या पद्धतीची नव्याने ओळख झाली. पेठ येथील वयस्क महिला गर्भाशयात गाठ आणि रक्तस्रावाच्या त्रासामुळे रुग्णालयात आली. मात्र कामाची वेळ संपल्याने तिला सायंकाळी उशिरापर्यंत आहे त्या स्थितीत बाहेर थांबावे लागले. विल्होळी येथील महिला पोटाच्या सततच्या दुखण्याला कंटाळून जवळच्या स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेली. पण बंदची पाटी पाहिली. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोन लहान मुलींना सोबत घेऊन तिने रुग्णालयही गाठले. पण केस पेपर कुठे काढायचा यात वेळ गेल्याने बाह्य़ रुग्ण कक्ष बंद झाला आणि तिच्यावरही त्रास सहन करत प्रतीक्षा करण्याची वेळ आली. रुग्णांसाठी बाह्य़ रुग्णाची वेळ वाढविली असली तरी कक्ष २४ तास सेवेत का नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचा पुढाकार

नाशिक जिल्हा प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपाच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची गुरुवारी भेट घेतली. गरोदर माता तसेच काही व्याधींनी त्रस्त महिला रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी संघटना सेवा देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. संप कालावधीत त्यांच्या काही रुग्णांनाही या ठिकाणी सेवा ते देणार आहेत.

मदतीच्या प्रतीक्षेत अस्वस्थ मित्र

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तसेच अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याची बाब समोर आली. शहरात अपघात झाल्याने गंभीर जखमी झालेल्या मित्राला केवळ वेळेत उपचार मिळाले नाही म्हणून जीव गमवावा लागला. त्याचे नातेवाईक रुग्णालयात येईपर्यंत मृत्यू प्रमाणपत्र व अन्य काही कागदोपत्रांची पूर्तता कशी करायची यात अस्वस्थ मित्र रुग्णालयात येरझाऱ्या घालत होते. मदत कोणाकडे मागावी या मानसिकतेत ते नव्हते. शून्यात हरवलेले ते चेहरे केवळ पोलीस सांगतील त्या दिशेने जात होते.