नादुरुस्त गाडय़ांच्या निषेधार्थ बस चालक-वाहकांचे आंदोलन

शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळाच्या दोन बसचे ‘ब्रेक’ निकामी झाल्यामुळे जुनाट गाडय़ांच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या चालक-वाहकांनी मंगळवारी सकाळी अकस्मात काम बंद आंदोलन पुकारल्याचा फटका शहरवासीयांना बसला. या संधीचा लाभ उचलत रिक्षाचालकांनी मात्र प्रवाशांची अक्षरश: लूटमार केली.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

मुळात शहर बससेवा चालविण्यात एसटी महामंडळाला आधीपासून स्वारस्य नाही. ही सेवा तोटय़ात असल्याने महामंडळाने त्यातून अंग काढून घेण्याचे संकेत दिले आहे. महापालिकेने ही सेवा चालवावी, असा महामंडळाचा प्रयत्न असताना अकस्मात बससेवा बंद झाल्यामुळे तर्कवितर्काना उधाण आले. दररोज हजारो नागरिक व विद्यार्थी बससेवेचा वापर करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे बससेवा सुरू होती. नियमित फेरी दरम्यान दोन बसचे ब्रेक निकामी झाले. चालकांनी द्राविडी प्राणायाम करीत बस पंचवटी आगारापर्यंत आणल्या. या घटनाक्रमाची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली आणि वातावरण तापले.

बस चालक-वाहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निमाणी बसस्थानकासह पंचवटी आगारात बस सुरू न करण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या भागांत वाहतूक करणाऱ्या बस जशा आगारात परतू लागल्या, तसतसे बससेवा विस्कळीत होऊ लागली. सकाळी साडेअकरा ते दुपारी चार या कालावधीत निमाणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. अचानक सुरू झालेल्या आंदोलनाची प्रवाशांना कल्पना नव्हती. शेकडो थांब्यावर नेहमीप्रमाणे ते बसच्या प्रतीक्षेत उभे होते. परंतु बराच वेळ होऊनही बस येत नसल्याने अखेर त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागला.

या संदर्भात विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चालक-वाहक आंदोलनाबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. शहर बससेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. काही बसमध्ये तांत्रिक दोष उद्भवला असेल असे त्या म्हणाल्या.

पंचवटीतील आगारप्रमुखांनी सकाळी दोन बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालक-वाहकांनी आंदोलन केल्याचे नमूद केले. नादुरुस्त बस तातडीने दुरुस्त करण्यात आल्या. कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. लवकरच बससेवा पूर्ववत होणार असल्याचा दावा त्यांनी केला. शहर बससेवेत जुनाट बसचे प्रमाण फार नाही. तांत्रिक विभागातील कर्मचारी सुटीवर गेल्याने दुरुस्ती कामावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

रिक्षाचालकांचे भाडे दुप्पट

आंदोलनाचा फायदा रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाच्या भाडय़ात अचानक लक्षणीय वाढ झाली. एरवी भागीदारीत रिक्षाद्वारे ज्या ठिकाणी जाण्यास १५ ते २० रुपये लागतात, तिथे प्रत्येकी ३० ते ४० रुपये आकारले गेले. स्थानिकांना लुबाडणाऱ्या रिक्षाचालकांनी बाहेरगावाहून आलेल्यांना अक्षरश: कोंडीत पकडले. मनाला वाटेल तसे भाडे आकारणी झाल्याचे सांगितले जाते. बससेवा ठप्प झाल्याचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नोकरदारांना बसला.

दुरुस्तीची कामे होत नसल्याच्या तक्रारी

शहर बससेवेसाठी जवळपास १८० बसचा वापर केला जातो. त्यात जुनाट गाडय़ांची संख्या अधिक आहे. तांत्रिक दोष असणाऱ्या बसेस आधिक्याने शहरात वापरल्या जातात. महामंडळाचा शहरात यांत्रिकी विभाग असूनही बसची संख्या मोठी असल्याने दुरुस्तीची कामे होत नसल्याची तक्रार चालकांनी केली. यांत्रिक विभाग दुरुस्तीची कामे करीत नसल्याने फेरी दरम्यान त्याचा जाच चालक, वाहक व प्रवाशांना सहन करावा लागतो, याकडे लक्ष वेधण्यात आले.