‘एनआरएचएम’ योजनेतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक असणाऱ्या २१ जिल्ह्य़ांतील १९४ तालुके व २१ नागरी विभागांत ‘एनआरएचएम’ योजनेंतर्गत २०१२-१३ पासून राबविण्यात येणारा कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम निधीअभावी अकस्मात बंद करण्यात आला आहे. यामुळे या योजनेंतर्गत कार्यरत २१६ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
ज्या जिल्ह्य़ांमध्ये एक लाख लोकसंख्येच्या प्रमाणात १० किंवा त्यापेक्षा अधिक कुष्ठरुग्ण आढळून आले. त्या ठिकाणी कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत कालबद्ध कार्यक्रम आखला. नवीन कुष्ठरुग्ण शोधणे, त्यांना नियमित उपचार देणे, यासाठी तसेच प्रत्येक तालुक्यात नियमित सर्वेक्षणासाठी २१ जिल्ह्य़ातील २१५ पॅरामेडिकल सेवक व कुष्ठरोगात येणाऱ्या विकृतींवर उपाययोजनांसाठी २१ फिजिओथेरपिस्ट अशी एकूण २३६ पदे कंत्राटी स्वरूपात मंजूर करण्यात आली होती. २०१४ पासून या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. २०१५-१६ वर्षांत पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात आले. परंतु पुनर्नियुक्तीचे कंत्राट देताना पुण्याच्या कुष्ठरोग विभाग कार्यालयाच्या सहसंचालकांकडून विलंब करण्यात आला. या सेवा अत्यावश्यक असल्याचे वरील कार्यालयाने निर्देशित करूनही २०१५-१६ वर्षांसाठी वेतनाचे अनुदास केंद्राकडून मागविण्यात आलेले नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा कंत्राट संपण्याच्या चार महिने आधीच कामावरून कमी करण्यात आले.
या २१ जिल्ह्य़ांपैकी अनेक तालुक्यात फक्त कंत्राटी कर्मचारी तालुका स्तरावर काम करीत असल्याने कुष्ठरुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. फिजिओथेरपिस्ट प्रत्येक तालुक्यात भेट देऊन तेथील कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रात कुष्ठरुग्णांना विकृती प्रतिबंधक व विकृती कमी करण्यासाठी देत असलेल्या सुविधा आता बंद आहेत.
अनेक नवीन कुष्ठरुग्ण सांसर्गिक प्रकारात सापडत असूनही निधीअभावी कार्यक्रम बंद करणे योग्य नसल्याचे राष्ट्रीय कुष्ठरोग अस्थायी कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.