एकनाथ खडसे यांचा स्वकीयांविरुध्द संताप

नाथा संपणारा नसून संपविणारा आहे. आयुष्यात आपण अनेक चढ-उतार पाहिले. पक्षात राहून जे आरडाओरड करत आहेत, त्यांचा आधी समाचार घेतला पाहिजे. थोबाड रंगवायचे असेल तर प्रथम त्यांचे रंगवा, विरोधकांचे नाही, अशा शब्दात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर प्रथमच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वकीयांविरोधात तोफ डागली. या सर्व घडामोडींमागे कोण आहे हे माहीत असले तरी आपण आता बोलणार नाही. अनेक गुपिते त्यामागे दडली आहेत. आपण तेव्हा गुपिते उघड केली असती तर संपूर्ण हिंदूुस्तान हादरला असता, असेही ते म्हणाले.
आगामी काळातील निवडणुकींचे नियोजन करण्यासाठी येथील सिंधी कॉलनीत आयोजित जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चाळीस वर्षांच्या राजकारणात सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. पण, अशी विचित्र स्थिती आली की भाषण कुठून सुरू करावे हा प्रश्न पडला आहे. मंत्रिपदाची आपण पर्वा करत नाही. हे ठरवून केलेले कृत्य आहे. एकाच गोष्टीचे दु:ख आहे की आपला आवाज दाबला गेला. त्यांच्याकडे पुरावे नसताना बेछूट आरोप झाले. आपला कोण, परका कोण हे आता ओळखले पाहिजे. पक्षात राहून जो पक्ष नेतृत्वाशी गद्दारी करत असेल त्याला संपविले पाहिजे. काही लोक आपल्यात राहून आपल्याला नाउमेद करत असतील तर हे योग्य नाही, असेही त्यांनी ठणकावले. लोकांना सर्व माहित असते. या सर्वातून आपण बाहेर येणार आहोत. सीतेलाही अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. महाभारतात पितामह यांना हरविता येत नव्हते, तेव्हा श्रीखंडीला पुढे यावे लागले. आपल्यावर विरोधी पक्षांनी आरोप केले नाही तर अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे केले गेले. यामागे कोण याचा खुलासा लवकरच केला जाईल. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिनाभरात आपले कोण, परके कोण हे कळले. राजीनामा दिल्याचे कळल्यावर पक्षातील एक आमदार रेल्वेत हात वरती करून नाचत असल्याचे भ्रमणध्वनीमध्ये पाहिले आहे. अशा लोकांना आपण सोबत घेणार आहोत काय, असा प्रश्न त्यांनी केला. आपण स्वत:साठी काहीही केलेले नाही. जे केले ते पक्षासाठी केले. ‘अजिब दास्ताँ है ये’ गाण्याचा संदर्भ देत खडसे यांनी कधी सुरू झाले आणि कुठे संपले हे आपणासही कळले नसल्याची कबुली दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तोडल्याचा त्यांना राग आहे. पण, युती तोडली नसती तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मेळाव्यात संतप्त कार्यकर्ते इतर नेत्यांचे मार्गदर्शन ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे बराच वेळ गोंधळ झाला. इतर नेत्यांनी भाषणे आटोपती घेतली. खडसेंवर आरोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्री काहीच बोलले नाही. राजीनामा दिल्यानंतर बोलले, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. मेळाव्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दांडी मारली.