मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांचे कौतुक; नेतृत्वासाठी रस्सीखेच

जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या एकेकाळच्या गुरुशिष्याच्या नात्यात अंतर निर्माण झाले आणि आता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी उभयता सोडत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. महाजनांनी अपमान केल्याची भावना खडसे समर्थकांना झोंबली व त्यातून आदळआपट तर झालीच, पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवून खडसे यांनी आपण माघार घेणार नाही, असा सूचक इशारा दिला. खडसेंवर कुरघोडी करण्याकरिता मग मुख्यमंत्र्यांनी महाजन यांचे तोंडभरून कौतुक तर केलेच, पण त्यांना राजकीय बळ मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.

एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असणाऱ्या जळगावमध्ये त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अलीकडेच झालेल्या दौऱ्यात गत चार महिन्यांपासून दाटलेल्या अस्वस्थतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पडसाद उमटलेच. या काळात स्थानिक पातळीवर जे काही घडले होते, ते पाहता खुद्द मुख्यमंत्र्यांनाही ते अनपेक्षित नसेल. मंत्रिपद सोडावे लागल्यापासून खडसे आपली खदखद वारंवार प्रगट करत आहेत. तोच धागा पकडत त्यांच्या समर्थकांनी या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आयोजित बैठकीत मानापमानाचे नाटय़ रंगवून गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही हा वाद सर्वांसमक्ष आला.

या पाश्र्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांचा दौरा शांततेत पार पडला असता तरच नवल. स्थानिक पातळीवर खडसे-महाजन गटात जसा सुप्त संघर्ष आहे, तसाच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून पत्ता कट झाल्यापासून राज्यात खडसे-फडणवीस यांच्यातही आहे. या दौऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून जळगाव येथे विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला खडसे गेले. तिथे उभयतांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. परंतु, तिथून त्यांचे मार्ग वेगळे झाले. मुख्यमंत्री जामनेरकडे तर खडसे आपल्या निवासस्थानी मार्गस्थ झाले. जामनेर हा महाजन यांचा मतदारसंघ. याच ठिकाणी आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी महाजन यांचे कौतुक करण्याची संधी सोडली नाही. मंत्र्याने मनात आणले तर चांगले काम करून दाखविता येते, हा त्यांचा दाखला बरेच काही सांगत होता. राज्यातील सर्वात चांगली उर्दू व मराठी शाळा जामनेरमध्ये पाहावयास मिळाली. महाजन यांच्यामुळे जळगावमधील सिंचन प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला असे प्रशस्तिपत्रकही त्यांनी दिले. दुसरीकडे या कार्यक्रमाकडे केवळ खडसेच नव्हे तर, त्यांचे समर्थक आमदार व खासदारांनी पाठ फिरवत सूचक संदेश दिला. मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यापासून महाजन हे फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये समाविष्ट झाले. खडसेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाजनांनी त्यांच्या सर्वपक्षीय विरोधकांची मोट बांधण्यात कसर ठेवलेली नाही. आता तर घरकुल घोटाळ्यात प्रदीर्घ काळ कारागृहात राहिलेले माजी मंत्री सुरेश जैन यांचीही जामिनावर सुटका झाली आहे. म्हणजे खडसे विरोधकांची संख्या वाढतच आहे. खडसे व त्यांच्या समर्थकांकडून जितका थयथयाट होईल, तितके त्यांचे मंत्रिमंडळातील परतीचे दोर कमकुवत होतील. भाजपमधील सुंदोपसुंदीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल, असे सामान्य कार्यकर्त्यांला वाटते. परंतु, सत्तेच्या साठमारीत पक्षापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अधिक प्रबळ ठरतात हे या घटना दर्शवितात.

वाद विकोपाला

जळगाव जिल्ह्य़ात खडसे आणि महाजन गटातील वाद सर्वश्रुत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर उभयतांनी परस्परांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप झाले होते. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणासह विविध आरोपांमुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागल्यानंतर या वादाला चांगलीच धार चढली. त्याचे प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर, जळगावमध्ये झालेल्या बैठकीत आले. शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत खडसे यांचे नाव तळाकडील बाजूला टाकल्यावरून महाजन यांच्या समक्ष कार्यकर्त्यांनी खुच्र्याची फेकाफेक करत घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे ही बैठक गुंडाळणे भाग पडले. हे काही अकस्मात घडलेले नाही. मंत्रिपद सोडावे लागल्यापासून खडसेंकडून वाग्बाणातून व्यक्त झालेली खदखद समर्थकांनी मनगटाच्या शक्तीद्वारे दाखविली इतकेच. यातून दोन उद्देश साध्य झाले. एक महाजनांच्या मतदारसंघातील कार्यक्रमांवर वादाचे सावट उभे करता आले. दुसरे म्हणजे निमंत्रण पत्रिकेतील क्रमवारीच्या मुद्यावरून खडसेंच्या मंत्रिपदाचा विषय रेटला गेला. खरे तर दुसऱ्या उद्देशाचे भवितव्य चौकशी पूर्णत्वास गेल्यानंतर निश्चित होईल. चौकशी समितीची स्थापना होऊन तीन महिन्यांचा काळ लोटला. त्यात केवळ समितीच्या कार्यालयाची स्थापना होऊ शकली. काही दिवसांपूर्वीच या समितीला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. खडसेंना चौकशीसाठी समितीने अद्याप एकदाही बोलाविलेले नाही. ही चौकशी जितकी लांबणीवर पडेल, तितकी खडसेंची अस्वस्थता वाढेल. ही बाब त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे.