‘ताई, लक्ष असू द्या.’ अशा विनवणीच्या सुरात दारात पडणाऱ्या कागदासोबत कधी दिनदर्शिका तर कधी छोटी वही हातात पडली तर नवल वाटू देऊ नका.. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यास अवधी असताना ईर्षेला पेटलेल्या इच्छुकांनी छुप्या पद्धतीने प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. घरोघरी वितरित होणारी केवळ प्रचारपत्रके व तत्सम वस्तूच नव्हे तर हळदीकुंकू, भंडारा व तत्सम सोहळ्यांना गल्लोगल्ली उधाण आले आहे. या कार्यक्रमांद्वारे उमेदवारांनी मतांची बेगमी करण्याची धडपड चालविली आहे. महापालिका निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना खर्चाची माहिती द्यावी लागते. हा अर्ज भरण्यास अवधी असल्याने सध्या उमेदवारांनी ‘होऊ द्या खर्च’चे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि इच्छुक उमेदवार सक्रिय झाले. याआधी सणोत्सव, धार्मिक कार्यक्रमांना शुभेच्छा देणाऱ्या फलकाच्या माध्यमातून झळकणारे चेहरे आता गल्लीबोळात हात जोडून मतदार राजाच्या दारात प्रगट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यासह अन्य पक्षांमध्ये युती, आघाडी की स्वबळ असा घोळ सुरू असतांना इच्छुक मात्र आपल्याला तिकीट मिळते की नाही, त्याहीपुढे जाऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या मानसिकतेत पोहोचले आहेत. पक्षीय उमेदवारी विलंबाने जाहीर होणार असल्याने प्रचाराला फारसा वेळ राहणार नाही. त्यामुळे सध्याच्या वेळेचा सदुपयोग केला जात आहे. काही जण प्रचारासाठी कालावधी किती राहणार, यंत्रणा कशी तयार होणार या विचाराने धास्तावले आहेत. या पाश्र्वभूमीवर, इच्छुकांनी नववर्ष, मकर संक्रातीचे औचित्य साधत जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. समाजमाध्यमांतून फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर इच्छुकांकडून शुभसंदेश येत असतांना त्यातही ओळखीचा चेहरा, आपला माणूस अशी टॅग लाईन वापरत प्रचार सुरू आहे. काहींनी नव वर्षांनिमित्त दिनदर्शिका देत कायमस्वरूपी मतदारांच्या नजरेसमोर राहू अशी व्यवस्था केली. प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत पर्यावरणवादी असलेल्या काही इच्छुकांनी कापडी पिशव्यांवर स्वतचे छायाचित्र, नाव, प्रभाग क्रमांक देत लक्ष असू द्या.. ही विनंती करत मतदारांचे लक्ष वेधले. काहींनी बच्चे कंपनीला शाळेत उपयोगी पडेल अशी वही देत कुटुंबीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला. तर संक्रातीला पतंग व साधा मांजा देत बच्चे कंपनीसह पालकांना आपलेसे करण्याची धडपड केली जात आहे.

साहित्याच्या माध्यमातून आपण काही वाटप केले तर त्याचा खर्च आयोगाला द्यावा लागेल अशी भीती वाटणाऱ्यांनी यातून वेगळीच शक्कल लढविली आहे. परिसरातील महिला वर्गाशी थेट संवाद साधत त्यांच्यासाठी गटागटाने रांगोळी प्रशिक्षण शिबीर घेत त्यांचा तपशील गोळा करणाऱ्यावर भर देण्यात येत आहे. रांगोळी प्रशिक्षणात येणाऱ्या महिला वर्गाची चहा, नाश्ताची व्यवस्था करत शिबिराविषयी अभिप्राय मागविताना संबंधित व्यक्तीचे नाव, त्यांचा भ्रमणध्वनी, ते काय करतात हा तपशील घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिराप्रमाणे सध्या हळदीकुंकू सोहळ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. महिला मतदारांशी संपर्क साधण्याचा हा मार्ग बहुतांश उमेदवार स्वीकारत आहे. उमेदवार आपल्या कुटुंबातील महिला वर्गाला पुढे करून या कार्यक्रमाचे आयोजन करतात. यावेळी जमलेल्या महिलांना पक्षचिन्हाच्या आकाराच्या कुयरीचे वितरण होत आहे. इतकेच नव्हे तर, प्रभागातील एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाद्यवृंदाची मैफलही सजते. भंडारा कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित होण्यास सुरुवात झाली आहे.