महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी असल्याने पेच

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांपुढे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात नात्यागोत्यांचे जाळे पसरलेले अनेक इच्छुक नाशिक शहरात स्थायिक झालेले आहेत. महापालिका निवडणूकप्रसंगी ग्रामीण भागातून मिळणाऱ्या रसदवर त्यांची प्रचार यंत्रणा बहुतांश प्रमाणात अवलंबून राहत असे. यावेळी मात्र त्याच दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक होणार असल्याने महापालिकेसाठी इच्छुकांना या रसदपासून मुकावे लागणार आहे.

नाशिक शहरात स्थायिक असलेल्या बहुतांश जणांचे मूळ गाव, नातेवाईक हे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील आहे. शहरात स्थायिक झालेल्यांची सर्वार्थाने आता ‘नाशिककर’ अशी ओळख निर्माण झाली असली तरी आपल्या गावाशी, ग्रामीण भागातील नातेवाईकांशी जुळलेली त्यांची नाळ कायम आहे. हे संबंध सुखदु:खाच्या प्रसंगात कामी येत असतात. राजकारणात तर या संबंधांचा अधिकच वाटा आहे. लोकसभा, विधानसभा असो किंवा महापालिकेची निवडणूक असो. कोणत्याही पक्षाचा उमेदवार स्थानिक पातळीवरील आपल्या कार्यकर्त्यांवर जितका विसंबून राहतो, त्यापेक्षा अधिक त्याचा विश्वास ग्रामीण भागातून नातेवाईक व मित्रमंडळींकडून मिळणाऱ्या मदतीवर असतो. त्यामुळेच राजकीय पक्षही उमेदवारी देताना इच्छुकांच्या नातेवाईकांचे जाळे कुठेकुठे पसरले आहे ते पाहतात. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या बळावरच बहुतांश उमेदवारांची प्रचार यंत्रणा आणि मतदानाच्या दिवशीचे गणित अवलंबून असते. सिडको, अंबड, सातपूर या कामगारबहुल भागात तर कोणत्या उमेदवाराला साथ द्यायची, कोणामागे उभे राहायचे हे सर्व ग्रामीण भागच ठरवीत असल्याचे म्हटले जाते.

महापालिका निवडणुकीत एकेक मत अमूल्य असल्याने ग्रामीण भागात पसरलेल्या नातेवाईकांची मदत घेणे उमेदवारास क्रमप्राप्त ठरते. महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत सिडको, सातपूर भागात ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचा मतदान होईपर्यंत मुक्काम असतो. नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या संबंधाच्या जोरावर या भागातून विजयाचे गणित मांडले जाते. शहरी भागातील एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यांवर जबाबदारीचे काम सोपवितानाच त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळीच पुढाकार घेत असल्याचे चित्र या परिसरातील प्रत्येक प्रभागात दिसून येते.

यावेळच्या निवडणुकीत मात्र शहरी भागातील इच्छुकांच्या प्रचार यंत्रणेची आणि लोकप्रियतेची खरी परीक्षा होणार आहे. महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक एकाच दिवशी होणार असल्याने ग्रामीण भागातून नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांची फौज शहरात येणे कठीण आहे. त्यामुळे नेहमीच्या हक्काच्या मदतीशिवाय इच्छुकांना आपली प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे. आपल्या परिसरातीलच निवडणूक असल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. आपला घरचा प्रचार सोडून शहरात प्रचारासाठी वेळ देणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक महापालिका निवडणुकीत सिडको, सातपूर भागात दिसणारे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे थवेच्या थवे यावेळी दिसणे जरा कठीणच आहे. केवळ कार्यकर्तेच नव्हे, तर आर्थिक स्वरूपात मिळणाऱ्या मदतीवरही त्यामुळे गदा येणार आहे. महापालिकेच्या मागील निवडणुकीत सिडको भागातून आपल्या भागातील ‘हिरा’ चमकविण्यासाठी मालेगाव तालुक्यातून कार्यकर्त्यांची फौज मोठय़ा प्रमाणावर दाखल झाली होती. त्यासंदर्भातील किस्सेही आजही चर्चिले जातात. अशा स्वरूपाची फौज यावेळी उपलब्ध होणार नसल्याने आता काय, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. अर्थात, अशीच समस्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनाही भेडसावणार आहे. कारण, शहरात स्थायिक झालेली नोकरदार मंडळी या निवडणुकांसाठी हमखास आपल्या गावी जात असतात. आता त्यांचीही गोची झाली आहे.