भुजबळ फार्ममधील आलिशान राजमहालातील दुर्मीळ वस्तूंची मोजदाद सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही सुरू राहिली. या दिवशी दुसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिकशी संबंधित उपकरणांची गणना व नोंदी घेण्यात आल्या. आदल्या दिवशी तळमजल्यावरील सर्व वस्तूंची मोजदाद करण्यात आली होती. या महालातील सर्व वस्तूंची मोजदाद पूर्ण झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पथकाचा मोर्चा परिसरातील इतर तीन बंगल्यांकडे वळणार आहे. या संपूर्ण कामास किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून त्या अनुषंगाने भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. सोमवारी भुजबळ यांच्या आलिशान महालापासून हे काम सुरू झाले होते. राजस्थानी पद्धतीच्या दुमजली महालास जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असा आधुनिकतेचा स्पर्श दिला गेला आहे. कलात्मक दिवे, दगडी कुंडय़ा आणि त्यातील ‘बोन्साय’ची झाडे, अस्सल सागवानी फर्निचर, महागडी पेंटिंग्ज, कलाकुसरीच्या असंख्य वस्तू यामुळे मूल्यांकन करणारे पथकही हरखून गेले. भुजबळ फार्मवरील असंख्य दुर्मीळ व महागडय़ा वस्तूंचे मूल्यांकन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील जाणकारांचीही मदत घेण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी महालातील केवळ तळमजल्यावरील वस्तूंची मोजदाद पूर्ण झाली. प्रत्येक वस्तू, ती कुठून आणली असावी, तिची कंपनी आदी माहिती नोंदविली जात आहे. दुसऱ्या दिवशी पथकाने महालातील दुसऱ्या मजल्यावरील मोजदाद सुरू केल्याचे मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी यांनी सांगितले. महालात इलेक्ट्रिकच्या कलात्मक वस्तूंची चांगलीच रेलचेल असून त्यांची मोजदाद करण्यात आली. महालातील हे काम पूर्ण होण्यास एक-दोन दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर फार्ममधील इतर तीन बंगल्यांची मोजदाद सुरू होईल, असे आवारी यांनी नमूद केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर हे कारागृहात असल्यापासून त्यांचे कुटुंबीय मुंबईला निघून गेले आहेत. कार्यवाहीवेळी भुजबळ यांचे निकटवर्तीय वगळता कोणीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी या परिसराकडे फिरकले नाही. या परिसरातील असंख्य दुर्मीळ वस्तूंमुळे मूल्यांकनाचे काम वाटते तितके सोपे नसल्याची जाणीव पथकाला झाली आहे.