झाडांची कॉक्रीटीकरणातून मुक्तता

शहर परिसरातील मोठी झाडे पेव्हरब्लॉक, डांबरीकरण यापासून मुक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनानंतर बुधवारी नाशिक महापालिकेच्या मुख्यालय आवारातील झाडे पर्यावरणप्रेमींनी पेव्हरब्लॉक, डांबरीकरणाच्या विळख्यातून मुक्त केली. यासाठी होणारा खर्च प्रशासनाकडून वसूल केला जाईल, असा इशाराही संबंधितांनी दिला आहे.

शहरात सातत्याने मोठी झाडे कोसळत आहेत. ही झाडे पेव्हरब्लॉक, डांबरीकरण, कॉक्रिटीकरणाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांची त्यातून सुटका करावी, याकडे पर्यावरणप्रेमी वारंवार लक्ष वेधत आहेत. जिल्हा न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर निर्देश देऊनही जिल्हा प्रशासन, महापालिकेला जाग आलेली नाही. यामुळे पर्यावरणप्रेमी आता स्वत:च निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मागील आठवडय़ात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पर्यावरणप्रेमींनी मोठी झाडे पेव्हरब्लॉक मुक्त केली होती. बुधवारी नाशिक महापालिकेचे मुख्यालय असणाऱ्या राजीव गांधी भवन परिसरात ही कारवाई करण्यात आली. राजीव गांधी भवन परिसरात रस्त्यालगत, इमारतीच्या मुख्य आवारात असलेली काही मोठी झाडे मोकळी करण्यात आली. क्रॉक्रीटीकरणाच्या जोखडातून त्यांना पूर्णपणे मुक्त करण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जाणार आहे. यासाठी लागणारा खर्च हा महापालिका प्रशासनाकडून वसूल केला जाईल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला. पालिका प्रशासनाने पेव्हरब्लॉक, डांबरीकरण व कॉक्रीटीकरणाद्वारे बुंधा घट्ट आवळलेली झाडे लवकरात लवकर मोकळी करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी निशीकांत पगारे, जगबीर सिंग, भारती जाधव, अश्विनी भट आदी उपस्थित होते.