शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील सांगली बँक सिग्नललगतच्या व्यापारी संकुलासमोर संशयास्पद सुटकेसमध्ये बॉम्बसदृश काही वस्तू असल्याचा संशय निव्वळ अफवा असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले. संगणक व्यावसायिकाने प्रिंटरच्या टोनरमध्ये वापरली जाणारी शाईची भुकटी सुटकेसमध्ये ठेवली होती. त्यातील काही भाग जमिनीवर सांडला होता. यामुळे या सुटकेसबाबत संशय बळावला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या तपासणीअंती ही बाब उघड झाल्यावर सर्वाचा जीव भांडय़ात पडला.

दुपारी १२ वाजेच्या सुमारास या घटनाक्रमाने परिसरात गोंधळ उडवून दिला. यशवंत व्यायामशाळेच्या समोरील बाजूला सिग्नल पलिकडे राहुल ट्रेडर्स हे संगणकाचे दुकान आहे. संबंधित व्यावसायिकाने रात्री दुकान बंद करताना टोनरच्या भुकटीचा कचरा फेकण्यासाठी सुटकेसमध्ये बाहेर ठेवला होता. ही भुकटी भरताना काही जमिनीवर सांडली. ही बाब पोलीस यंत्रणेसह सर्वसामान्यांची धावपळ उडवण्यास कारक ठरली.

दुपारी बारा वाजता स्वच्छता करण्यासाठी आलेल्या कामगारांना ही बाब निदर्शनास आली. संबंधित दुकान बंद असल्याने सुटकेसमध्ये नेमके काय आहे, याची स्पष्टता झाली नाही. स्थानिकांनी संशयास्पद सुटकेसची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. सुटकेसजवळ असणारी भुकटी नेमकी कशाची आहे त्याची स्पष्टता होत नव्हती.

पथकातील अधिकारी अमृत पाटील यांनी बॅगची तपासणी केली असता टोनरमध्ये वापरली जाणारी काळी शाई (भुकटी) असल्याचे निष्पन्न झाले. टोनरची खराब झालेली भुकटी कचरा म्हणून फेकून देण्यासाठी ठेवण्यात आली होती. दुकान बंद असल्याने त्याबद्दल प्रारंभी कोणी माहिती दिली नाही.

या एकंदर प्रकाराने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. पथकामार्फत संशयास्पद बॅगची तपासणी सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्याचा परिणाम मेनरोड-महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतुकीवर झाला. बॅगमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याचा उलगडा झाल्यावर सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला.