शहरात बनावट पोलिसांचा सुळसुळाट झाला असून पोलीस असल्याची बतावणी करत एकाच दिवसात वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन घटनांमध्ये पावणे दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे पुढे आले आहे. वारंवार अशा घटना घडत असुनही ना पोलीस यंत्रणा त्यावर नियंत्रण मिळवू शकली, ना नागरिकांनी जागरुकता दाखविली.
पहिली घटना नाशिकरोडच्या गंधर्वनगरी भागात घडली. शिखरेवाडी येथील जॉगिग ट्रॅकवरून परतत असतांना भिकणअप्पा चिकनअप्पा सत्तरपुढे (६९) यांना पल्सरवरील २५-२७ वयोगटातील युवकांनी अडविले. आम्ही पोलीस हवालदार असून पुढे चोरीची घटना घडली आहे. इतके दागिने अंगावर घालून गर्दीत कशाला जाता, आमचे ओळखपत्र पहा, आम्ही तुमच्या भल्याचे सांगत आहोत असे सांगून त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवले.
भिकणआप्पा यांनी अंगावरील सहा तोळ्याची चैन, चांदीची घंटा व रुद्राक्ष माळ असा एकुण एक लाख २२ हजाराचा माल पिशवीत ठेवला. तो व्यवस्थित ठेवला की नाही हे पाहण्यासाठी संशयितांनी पिशवी ताब्यात घेऊन तपासणीचे नाटक करत ती पिशवी लक्षात येणार नाही अशी ठेऊन घेतली. घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यावर सत्तरपुढे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दुसरी घटना चेतनानगर परिसरात घडली. विजयमाला आत्माराम जाधव (६५) या सायंकाळी हरिपाठावरून घरी परतत असतांना सह्य़ाद्री व्यायाम शाळेजवळ पोलिसांचा वेश परिधान केलेल्या संशयितांनी आम्ही पोलीस आहोत, पुढे खुप गर्दी आहे, तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा असे सांगून जबरदस्तीने अंगावरील १७ ग्रॅम वजनाची ५५ हजार रुपयांची मोहनमाळ पर्समध्ये ठेवण्यास भाग पाडले. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील पर्स संशयितांनी लांबविली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावीही बनावट पोलिसांचा धुमाकूळ
पोलीस असल्याची बतावणी करत दोघा अनोळखी भामटय़ांनी साठ वर्षीय महिलेची ३७ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत लंपास करण्याची घटना मालेगावच्या संगमेश्वर भागात घडली. अत्यंत वर्दळीच्या आणि पोलीस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेवरून चोरटय़ांचे निर्ढावलेपणाची प्रचिती आली आहे. सोयगाव नववसाहत भागातील सुशिला मोरे या पायी जात असतांना मारूती चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी पोलीस असल्याचे सांगत त्यांना हटकले. रहिवासाचे ठिकाण विचारत गावात चोर-भामटे फिरत असल्याची भीती दाखवत गळ्यातील पोत पर्समध्ये ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याला बळी पडून सुशिलाबाई यांनी सोन्याची पोत पर्समध्ये ठेवली. परंतु काही वेळाने पर्समधील पोत गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघा भामटय़ांनी आपल्याला ठगविल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या काही महिन्यांपासून शहर व तालुका भागात पोलीस किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून लोकांना ठगविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातील बहुसंख्य घटनांमध्ये भामटय़ांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.