नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये मक्याची लागवड करताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रामदास पोपट राठोड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. रामदास राठोड आपल्या शेतात त्यांची पत्नी सुरेखा, भाऊ नवनाथ यांच्यासोबत मका लागवड करत होते. त्या दरम्यान पाऊस सुरू झाला. ज्यानंतर शेतातल्या कामाची आवराआवर सुरु करण्यात आली. ज्यावेळी अचानक रामदास राठोड यांच्या अंगावर वीज पडली. त्यात ते जागीच कोसळले. या दरम्यान त्यांचा भाऊ अरूण यांनाही विजेचा चटका लागून तेदेखील या घटनेत जखमी झाले.

रामदास राठोड यांना जागेवर उलटी झाली. त्यांना त्यांच्या भावाने तातडीने नांदगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक रोहन बोरसे यांनी त्यांना तपासले, मात्र तोवर रामदास यांचा प्राण गेला होता. त्यामुळे डॉक्टर रोहन बोरसे यांनी त्यांना मृत घोषित केले. आज संध्याकाळी उशिरा रामदास राठोड यांच्या पार्थिवावर पोही या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच वीज कोसळली त्या ठिकाणचा पंचनामाही करण्यात आला आहे.