राज ठाकरे यांचा सवाल
दुष्काळाच्या मुद्दय़ावरून विरोधक आक्रमक झाले असताना या स्पर्धेत मनसे कुठे मागे राहू नये, यासाठी राज ठाकरे यांनी धडपड सुरू केली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेताना शेतीशी निगडित स्वत:ला पडलेल्या काही प्रश्नांचे निराकरण संबंधितांकडून करून घेतले. दुष्काळाच्या संकटाला राष्ट्रवादीला जबाबदार ठरवताना राज यांनी मनसेने गतवेळी राज्यात चारा छावण्यांची व्यवस्था करूनही निवडणुकीत शेतकरीवर्ग दुसऱ्याच पक्षांच्या मागे का गेला, असा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या कृषी संदर्भातील विषयास पाठिंबा देण्यासाठी खा. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.
मनसेच्या येथील राजगड कार्यालयात झालेल्या बैठकीत राज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती करणे दिवसागणिक धोकादायक व खर्चीक होत आहे. खत, वीज, बी-बियाणे यावर भरमसाट खर्च करताना दुष्काळ, गारपीट ही नैसर्गिक संकटे पाचवीला पुजलेली आहेत. प्रत्येक वेळी गुंतवणूक करून तिचा परतावा मिळेल याची शाश्वती नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. कृषी विभागाचा मनमानी कारभार आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही अशी तक्रार काहींनी केली. कर्जमाफी, वीज देयकात सवलत या व्यतिरिक्त शेती व्यवसाय सधन होण्याकरिता काय करता येईल, अशी विचारणा राज यांनी केली. त्यानंतर त्यांनी शेतकरीवर्गाच्या दुहेरी राजकीय भूमिकेवर बोट ठेवले. जे राजकीय नेते दुष्काळ लादतात ते निवडून कसे येतात. राज्याची सत्ता सलग १५ वर्षे उपभोगणाऱ्या आणि ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या राजकीय पक्षांना आता पुळका आला असून दुष्काळाच्या मुद्दय़ावर ते आंदोलन करत आहेत. गतवेळच्या दुष्काळी स्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बहुतांश भागांत चारा छावणीची व्यवस्था केली होती. परंतु, निवडणुकांमध्ये शेतकरीवर्गाने मते दुसऱ्याच पक्षांच्या पारडय़ात टाकली, याची आठवण राज यांनी करून दिली.