सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळा तालुक्यातील खालप येथील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात आणि माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. सूर्यवंशी यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी, दोन मुलगे आहेत. देवळा येथे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोहणेर शिवारातील रवींद्र आहेर यांच्या शेतातील विहिरीत खालप येथील संजय तानाजी सूर्यवंशी (४६) यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार पानी पत्र लिहिले आहे. पोलिसांनी ते ताब्यात घेतले.

कृषी पदविका घेऊन ग्रामसेवक होण्याची संधी मिळाली असताना राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे ग्रामसेवक होता आले नाही. आमच्या बाजूने निकाल लागूनही नोकरीपासून वंचित रहावे लागले. त्यासाठी न्यायालयीन लढा दिला. त्यानंतर ४७ आर जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असताना गावातील राजकारणाचा बळी ठरून अल्पभूधारक असल्याने कोणताही लाभ मिळू शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शेतातील अल्प उत्पन्नामुळे कर्जबाजारी होण्याची नामुष्की ओढवली. मुलांच्या शिक्षणाचा खर्च उभारता आला नाही. मोठा मुलगा नाशिक येथे उच्च शिक्षण घेत असून, त्याला पैसे देता आले नाहीत, असे सूर्यवंशी यांनी पत्रात नमूद केले आहे.