चणकापूर धरणातून शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या तळवाडे तलावापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून चणकापूर धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत होऊ लागल्याने सिंचन क्षेत्रातील घसरणीमुळे आधीच शेतकऱ्यांची परवड सुरू झाली असतांना सध्याच्या कालव्याद्वारे साठवण तलाव भरण्याऐवजी थेट जलवाहिनी टाकल्यास पाण्याची पातळी खालावण्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडेल, अशी भीती यासंदर्भात व्यक्त करण्यात येत आहे.
शहरासाठी चणकापूर व गिरणा या दोन धरणांमधून पाणी आरक्षण केले जाते. चणकापूर धरणातून गुरूत्वाकर्षण पध्दतीने तर गिरणा धरणातून उपसा पध्दतीने पाणी उपलब्ध होते. उपसा पध्दतीने पाणी घेतल्याने वीज आकारणीचा आर्थिक भार सहन करावा लागतो. साहजिकच चणकापूर धरणातून अधिकाधिक पाणी घेण्यावर पालिका प्रशासनाचा भर असतो. या धरणाच्या २७०० दशलक्ष घनफुट क्षमतेपैकी तब्बल १६०० दलघफु पाणी या वर्षी केवळ मालेगाव शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत चणकापूर धरणातून हे पाणी ठेंगोडे बंधाऱ्यापर्यंत गिरणा नदीपात्रातून तर त्या ठिकाणाहून कालव्याद्वारे पालिकेच्या मालकीच्या तळवाडे येथील साठवण तलावात आणले जाते. मात्र या पध्दतीत प्रवाही तूट, बाष्पीभवन या सारख्या कारणांमुळे मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. हा तलाव भरण्यासाठी प्रत्येक आवर्तनासाठी चणकापूरमधून किमान ३०० दलघफु पाणी सोडावे लागते. त्यासाठी दरवर्षी पाच ते सहा आवर्तने सोडली जातात. पाण्याच्या या आरक्षणाच्या तुलनेत प्रत्यक्षात फारच थोडे पाणी शहराच्या ओंजळीत पडत असल्याने चणकापूर धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यात यावी असा एक मतप्रवाह काही दिवसांपासून सुरू आहे. अलीकडे केंद्र शासनाच्या अमृत योजनेत राज्यातील ४३ शहरांबरोबर मालेगावचाही समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये खर्चाच्या चणकापूर धरणातून जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे.
नदी व कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या आवर्तनामुळे पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होत असते. मात्र जलवाहिनीद्वारे पाणी नेल्यास पाण्याची पातळी खालावणार असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रस्तावाला विरोध सुरू झाला आहे. त्यासाठी लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन संघर्ष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. के. एन. अहिरे यांनी दिली आहे.