नाशिक जिल्ह्य़ातील दोघा शेतकऱ्यांचा आत्महत्येसाठी भयंकर मार्ग

एका शेतकऱ्याने उच्च दाबाची विद्युत वाहिनी हाती पकडत तर दुसऱ्याने चिता रचत त्यावर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जमाफीसाठी जिल शासकीय अध्यादेशांची होळी केली जात असताना दुसरीकडे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करताना अवलंबिलेल्या मार्गाने प्रशासनही हादरले आहे.

चांदवड तालुक्यातील बोराळे गावात पहिली घटना घडली. अप्पासाहेब खंडेराव जाधव (३२) या तरूण शेतकऱ्याने वीज कंपनीच्या रोहित्रावर चढून उच्च दाबाची वाहिनी हाती पकडल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. जाधव हे काही दिवसांपासून अस्वस्थ होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी सोसायटीचे ५० हजाराचे कर्ज घेतले होते. हप्ते भरूनही ही रक्कम कमी झाली नाही. अलिकडेच सोसायटीने त्यांना मुद्दल व व्याज असे एकूण ७८ हजार रुपयांच्या वसुलीसाठी जप्तीची नोटीस बजावली होती. शेतीतून उत्पन्न येत नसल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेत त्यांनी वीज वाहिनी हाती पकडून आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दुसरी घटना बुधवारी पहाटे मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे घडली. सुपडू भिका पवार (७७) यांनी घरालगतच्या मोकळ्या परिसरात चिता रचून पेटवून घेतले. चिता पेटत असल्याचे काही वेळाने आसपासच्या तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना जागे केले. आग विझवत पवार यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच, त्यांचा मृत्यू झाला.