कांद्याला २५ पैसे किलो भाव मिळाल्याने संताप

सटाणा बाजार समितीत दुय्यम प्रतीच्या कांद्याला २५ रुपये क्विंटल अर्थात २५ पैसे किलो भाव जाहीर झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर कांदा फेकून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. मातीमोल भावात खरेदी करताना काही कांदा खरेदीला व्यापाऱ्यांनी नकार दिला. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा शेतकऱ्यांनी निषेध केला. कांद्याचे भाव गडगडण्याची श्रुंखला अद्याप कायम असून शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत पहिल्या प्रतीच्या कांद्याची केवळ ४०० रुपये क्विंटल भावाने खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.

मागील चार ते पाच महिन्यांत ८०० ते एक हजार रुपयांच्या दरम्यान असणारे कांदा भाव मागील काही दिवसात प्रति क्विंटलला ४०० रुपर्यापर्यंत घसरले आहेत. मागील महिन्यात व्यापाऱ्यांच्या संपामुळे महिनाभर कांद्याचे लिलाव बंद होते. चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा या काळात मोठय़ा प्रमाणात खराब झाला. काढणीनंतर पाच ते सहा महिने साठवूनही दोन पैसे मिळण्याऐवजी नुकसानीत त्यांची विक्री करावी लागत असल्याने शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यात आजही तीन ते चार लाख मेट्रिक टन कांदा साठवलेला आहे. देशांतर्गत बाजारात मागणी नसल्याने त्यांचे भाव दिवसागणिक तळ गाठत आहेत. या घडामोडी घडत असताना व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा प्रकार सटाणा बाजार समितीत घडला.

सकाळी शेतकरी सटाणा बाजारात ट्रॅक्टरमधून कांदा घेऊन आले होते. पहिल्या तीन ट्रॅक्टरमधील माल खराब असल्याचे सांगून व्यापाऱ्यांनी तो खरेदी करण्यास नकार दिला. त्या पुढील ट्रॅक्टरमध्ये पिंगळवाडे येथील रवींद्र चव्हाण यांचे कांदे होते. त्याला व्यापाऱ्यांनी २५ पैसे किलो म्हणजे क्विंटलला २५ रुपये भाव पुकारला. हा दर ऐकून शेतकरी संतप्त झाले. चव्हाण यांनी कांदा विक्री करायचा नाही, अशी भूमिका घेतली. ही माहिती समजल्यानंतर शेतकरी जमा झाले. त्यांनी ट्रॅक्टरमधील कांदा घेऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धाव घेतली. सटाणा-मालेगाव रस्त्यावर कांदे फेकण्यात आले. व्यापाऱ्यांच्या कार्यशैलीविरोधात घोषणा देत शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू राहिले. अखेरीस बाजार समिती संचालक व पोलीस अधिकारी यांनी मध्यस्ती केल्यानंतर दुपारी एक वाजता शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार झाले. त्यानंतर लिलाव पूर्ववत झाले. मागील महिन्यात सायखेडा उपबाजारात या पद्धतीने कांदा अवघ्या पाच रुपये क्विंटल म्हणजे पाच पैसे भावाने खरेदी केला गेला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. शासनाने जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला १०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, सध्या इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला ४०० रुपये सरासरी भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला ८०० रुपये असताना त्यापेक्षा निम्मा भाव मिळत असल्याने उत्पादक संतप्त आहेत. हा भाव आणि शासकीय अनुदान यातून या हंगामात उत्पादन खर्च, साठवणुकीचा खर्च भरून निघणार नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.