इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल क्षेत्रातील विविध संधींबाबत मंथन.. या क्षेत्रातील संशोधनावर पडलेला प्रकाश.. उपकरणांच्या तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापण्याची तयारी.. स्थानिक उद्योगांना संरक्षण क्षेत्रातील यंत्रसामग्री निर्मितीत पुढे येण्याचे झालेले आवाहन.. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्यातर्फे आयोजित ‘निमा पॉवर २०१६’ या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल प्रदर्शनाची ही ठळक वैशिष्ठय़े ठरली. ‘इलेक्ट्रोफाईंग दी फ्युचर’ या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शनात उद्योजकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे आशादायक चित्र निर्माण झाले.
त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर्स डोम येथे झालेल्या प्रदर्शनात लघू, मध्यम व मोठय़ा उद्योगांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सहभागीर्थीच्या संख्या लक्षणिय राहिली. यंदा आयोजकांनी अधिकाधिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना प्रदर्शनात वाव दिला होता. प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे उद्घाटन इप्कॉस इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, एबीबी इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी. पी. व्यास, महापौर अशोक मुर्तडक आदींच्या उपस्थितीत झाले. एचएएलचे वरिष्ठ व्यवस्थापक एस. के. सिन्हा यांनी लढाऊ विमानांच्या सुटय़ा भागाची आयात कायदेशीर बाबींमुळे विलंबाने होते. त्याचा विमान बांधणीवर परिणाम होतो. यामुळे या सुटय़ा भागांचे स्थानिक पातळीवर उत्पादन झाल्यास तर स्थानिक रोजगारवाढीला चालना मिळेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इप्कॉसचे बॅनर्जी यांनी नाशिकच्या विकासात इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे नमूद केले. एबीबीचे व्यास यांनी कंपनीच्या विस्तारासाठी नाशिकचा विचार केला जात असल्याचे नमूद केले. सीपीआरआयचे नागपूर विभाग प्रमुख राजेश रंजन यांनी १०० कोटींची गुंतवणूक करून शहरात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले. उद्घाटन सत्रात निर्माण झालेले आशादायक वातावरणाने प्रदर्शनात उत्तरोत्तर रंग भरले.
चार दिवसात प्रदर्शनात सुखोई ३० विमानाच्या सुटय़ा भागाचे स्वदेशीकरण आणि त्यातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल भागांची माहिती यावर मार्गदर्शन करण्यात आले. सद्यस्थितीत एचएएल कोणते भाग आऊटसोर्सिग करते, त्यात उद्योजक आपला सहभाग कसा वाढवू शकतात याबद्दल माहिती दिली गेली. सौर ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण विषयक परवानगी. आदी विषयांवर परिसंवाद झाले. प्रदर्शनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादन, मोठय़ा उद्योगांना लागणारी सामग्री, संशोधन यावर प्रकाशझोत पडला. प्रदर्शनांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प सादरीकरणाची संधी देण्यात आली. यामुळे या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा लक्षणिय सहभाग राहिला. प्रदर्शनाच्या यशस्वीततेसाठी प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांच्यासह निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर आदींनी प्रयत्न केले.