एकाच व्यापारी संकुलातील दुसरी घटना

कॉलेजरोडवरील ईझी डे मॉलच्या इमारतीतील एका दुकानाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत पादत्राणांचे दालन पूर्णपणे भस्मसात झाले. चार ते पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. महत्वाची बाब म्हणजे, याआधीही या संकुलातील एका दालनास मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी आग लागली होती. विद्युत जनित्र किंवा यंत्रसामुग्रीवर अतिरीक्त भार दिला गेल्यामुळे हे प्रकार वारंवार घडत असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.
कॉलेजरोड येथील ईझी डे मॉलच्या इमारतीत साधारणत वर्षभरापूर्वी पादत्राणांच्या दालनाला आग लागली होती. त्यात दालनासह मॉलचे काही अंशी नुकसान झाले. त्याची पुनरावृत्ती रविवारी घडली. इमारतीच्या दर्शनी भागात असलेले मोची फुटवेअर या दालनातुन रात्री साडे नऊ वाजता अचानक धूर बाहेर येऊ लागला. गणेश विसर्जनानिमित्त मॉलमधील सर्व दालने बंद असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
आग लागल्याचे लक्षात आल्यावर स्थानिकांनी लगेचच अग्निशमन विभागाला माहिती दिली. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. दालनातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. संपूर्ण इमारत आगीने वेढली जाते की काय, असे दिसत असताना अग्निशमन दलाने पाण्याच्या फवाऱ्यासह फोमचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. पाच ते सात बंबांच्या सहाय्याने दलाचे अधिकारी अनिल महाजन, तिडके, बैरागी यांच्यासह पथकाने तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अत्याधुनिक हायड्रोलिक अग्निशमन बंबाचाही वापर करण्यात आला. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. यामुळे आग विझविण्याच्या कामात अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. तीन ते चार तासात दालनातील महागडे बुट व चप्पल जळून खाक झाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
आगीची झळ आसपासच्या दुकानांनाही बसली. दरम्यान, वर्षभराच्या काळातील या इमारतीतील आगीची ही दुसरी दुर्घटना असल्याने याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. व्यावसायिकांनी विद्युत जनित्र किंवा तेथील यंत्रसामुग्रीवर अतिरिक्त भार दिल्याने हे प्रकार वारंवार घडत असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.