लष्करी आगारांमधील सदोष दारूगोळ्याचा प्रश्न तीन महिन्यांत मार्गी

पुलगाव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी

लष्कराच्या देशभरातील आगारांतील त्रुटीयुक्त दारूगोळा तीन महिन्यांत एक तर बदलला जाईल अथवा त्याची दुरुस्ती केली जाईल. ज्या सदोष सुरुंग, बॉम्बगोळ्यांमधून ‘टीएनटी’ हा द्रवयुक्त पदार्थ बाहेर पडतो, असा दारूगोळा नष्ट करण्याची जबाबदारी लष्करी मुख्यालयांवर सोपविण्यात आली आहे. वर्धा जिलतील पुलगाव येथे अलीकडेच झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या संरक्षण मंत्रालयाने सुरक्षिततेसाठी तातडीने ही पावले उचलली आहेत. पुलगावच्या आगीत तब्बल आठ कोटी रुपयांचा दारूगोळा भस्मसात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे दारूगोळा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगावमध्ये तीन महिन्यांपूर्वी आगीच्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीनंतर समोर आलेल्या शिफारशींच्या आधारे अशा घटना रोखण्यासाठी उपरोक्त नव्या निकषांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. दारूगोळा भांडारातील आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. पुलगावची घटना वगळता मागील तीन वर्षांत देशातील कोणत्याही दारूगोळा आगारात आगीची घटना घडलेली नाही. दारूगोळ्याची साठवणूक हे अतिशय जोखमीचे काम असते. हाताळणी व साठवणुकीदरम्यान मानक संचालन प्रक्रियेचे (एसओपी) काटेकोरपणे पालन करून धोके कमी करता येतात. प्रत्येक दारूगोळा त्याच्या वैशिष्टय़ानुसार आवश्यक त्या निकषांची पूर्तता करून ठेवला जातो. वार्षिक तपासणी होते. प्रत्येक आगारात आग विझविण्याचे प्रात्यक्षिक केले जाते. आगारातील दारूगोळ्याची नियमित तपासणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आता त्यात नव्याने दक्षता बाळगली जाणार आहे. आगारांमधील सदोष रणगाडाविरोधी सुरुंग, ‘१ ए एनडी’सारखा दारूगोळा नष्ट करण्याचे काम लष्करी मुख्यालयांमार्फत केले जाईल. आयुध निर्माणी मंडळास आगारातील त्रुटीयुक्त दारूगोळा तातडीने बदलणे अथवा त्याची दुरुस्ती करण्यास सूचित करण्यात आले आहे. लष्करी मुख्यालय दारूगोळा उत्पादक ते वापरकर्ता या साखळीतील सर्व घटकांशी चर्चा करून मानक संचालन प्रक्रियेस नव्याने अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यात सदोष दारूगोळ्यातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्याचाही अंतर्भाव राहील. सदोष दारूगोळा नष्ट करण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण केले जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.