अशोक स्तंभ परिसरातील संचेती टॉवर इमारतीच्या तळघराकडे जाणाऱ्या जिन्यातील वीज मीटरच्या जाळ्यास मंगळवारी सकाळी आग लागल्याने खालील भागात अडकलेल्या १४ विद्यार्थिंनींसह एकूण १७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन यंत्रणेला शर्थ करावी लागली. मीटर व वायर जळाल्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले. यामुळे तळघरातील क्लास व छापखान्यात अडकलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या पथकाने युध्दपातळीवर कार्यवाही करत आग विझविली आणि संबंधितांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, तळघरात क्लास चालविल्यावरून चालकाविरुध्द कारवाई केली जाणार असल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
अतिशय गजबजलेल्या भागात सकाळी ही घटना घडली. संचेती टॉवर हे भव्य व्यावसायिक संकुल आहे. इमारतीच्या तळघरात छापखाना, श्री निवास क्लास व उदय करिअर अकॅडमी आहेत. तळघराकडे जाणाऱ्या जिन्यात संपूर्ण इमारतीचे वीज मीटरचे जाळे आहे. नेहमीप्रमाणे तळघरात शिकवणी सुरू असताना साडे अकराच्या सुमारास जिन्यातील वीज मीटर शॉर्क सर्किटमुळे पेटले. काही वेळात आसपासचे मीटर व वायरही जळू लागले. यामुळे सर्वत्र धूर पसरला. तळघरातून वर येण्यासाठी एकच मार्ग असल्याने खाली अडकलेल्यांना बाहेर पडणेही अवघड झाले. धुरामुळे श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक तीन बंबांसह दाखल झाले. पथकाने प्रथम अर्धा तास फोम व पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या काळात पथकातील कर्मचारी तळघराकडे गेले आणि त्यांनी विद्यार्थिनींची सुटका केल्याची माहिती अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेंद्र बैरागी यांनी दिली. त्यात आरती गांगुर्डे, मोहिनी जाधव, सृष्टी शिरसाठ, ऋषी कावळे, वंदना साळवे आदींचा समावेश आहे. छापखान्यात अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले. आग आटोक्यात आणण्यास काही विलंब झाला असता तर अनर्थ घडला असता अशी भीती अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.
आगीमुळे तळघरात अडकलेल्या विद्यार्थिनी इयत्ता आठवी ते दहावीच्या असून त्या श्रीनिवास क्लासमध्ये शिक्षण घेतात. शहरात तळघरात क्लास चालविण्यास परवानगी नसताना या इमारतीत दोन क्लास सुरू असल्याचे निदर्शनास आले. या बाबतच्या नियमांची पडताळणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.