पाच महिन्यांत २४ खून
शहरातील कायदा व सुव्यवस्था दिवसागणिक ढासळत असून शुक्रवारी रात्री एका टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका युवकाचा निर्घृण खून केला. या हल्ल्यात अन्य एक गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. मागील पाच महिन्यांत खुनाची ही चोविसावी घटना आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. त्यात दिवसागणिक नव्याने भर पडत आहे. शुक्रवारी रात्री हनुमानवाडी चौकात पाणीपुरी व भेळचा व्यवसाय करणारा सुनील रामदास वाघ (२५, हनुमानवाडी) आणि भाऊ हेमंत यांच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून कुंदन परदेशी, किरण परदेशी, अभय इंगळे, कालेकर, अन्मी वाळके यांनी वाद घालला. टोळक्याने सुनीलवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवला. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेमंतवरही त्यांनी वार केले. सुनीलच्या डोक्यात दगड टाकण्यात आला.
या हल्ल्यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी हेमंतला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ज्या टोळक्याने वाघ बंधूंवर हल्ला केला, त्यातील संशयित कुंदन परदेशी, किरण परदेशी व अक्षय इंगळे यांच्यावर याआधी मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. महिनाभरापूर्वी ते जामिनावर सुटले होते.
संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदीचे आदेश दिले. येवला पोलिसांनी स्विफ्ट मोटारीचा पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.